चीनची होतेय थट्टा; हॉलिवूडमधील क्लिप्स दाखवून केला अमेरिकेवर हल्ल्याचा दावा

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 22 September 2020

चिनी सैन्याकडूनच हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे

बिजिंग- अमेरिकेसोबत सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने प्रशांत महासागरातील अमेरिकेचे नौदल बेस गुआमवरील हल्ल्याचा एक खोटा व्हिडिओ व्हायरल केला आहे. या व्हिडिओमुळे चीनचे एअरफोर्स थट्टेचा विषेय ठरला आहे. कारण या व्हिडिओत चीनने हॉलिवूड चित्रपट 'ट्रान्सफॉर्मर' आणि 'द रॉक'मधील क्लिप्स चोरुन व्हिडिओ तयार केला आहे. 

हल्ल्यात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वायुदलाने एच-6 आण्विक बॉम्बरचा वापर केला असल्याचं दाखवण्यात आलं आहे. चिनी सैन्याकडूनच हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यात एच-6 बॉम्बर अमेरिकी एंडरसन एअर फोर्स बेसवर बॉम्ब टाकताना दिसत आहे. मात्र, व्हिडिओ फेक असल्याचे समोर आल्याने चीनला ट्रोल केले जात आहे. 

चिनी एच-6 बॉम्बरने अमिरेकी तळावर केला हल्ला!

पीपल्स लिबरेशन आर्मी एअरफोर्सच्या वीबो अकाऊटंवर हा व्हिडिओ शनिवारी अपलोड करण्यात आला आहे. चिनी वायुसेनेचा 2 मिनिट आणि 15 सेकंदाच्या हा व्हिडिओ एखाद्या हॉलिवूड चित्रपटाच्या ट्रेलरपणे दिसतोय. ज्यात चीनचा एच-6 बॉम्बर वाळवंटातील एका भागातून उड्डाण करताना दिसत आहे. युद्धाचे देवता एच-6 बॉम्बर हल्ल्यासाठी जात आहेत, असं व्हिडिओत म्हणण्यात आलं आहे.  

व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलंय की, चिनी एअरफोर्सचा एक पायलट हवेत बटन दाबतो आणि एक मिसाईल समुद्राच्या किनाऱ्यावरील रनवेवर जाऊन फुटते. मिसाईल फुटल्यानंतर उपग्रहातून याचे दृष्य दाखवले जाते. यात हा रनवे अमेरिकी नौदल बेस गुआमच्या एंडरसन एअरफोर्स बेसप्रमाणे दिसून येतोय. चीनने या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड देखील वापरले आहेत.  

चीन आणि अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाकडून कसलंही वक्तव्य नाही

पीएलएने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'मातृभूमिच्या हवाई सुरक्षेचे रक्षक' असं लिहिलं आहे. आम्ही आमच्या मातृभूमीची सुरक्षा करु शकतो, तशी क्षमता आमच्यामध्ये आहे, असं पीएलएने म्हटलं आहे. असे असले तरी चीन आणि अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाकडून यासंबंधी कोणतीही टीपण्णी करण्यात आलेली नाही. 

सिंगापुरच्या इन्स्टिट्यूट ऑफ डिफेंस अँड स्ट्रेटेजिक स्टडीजचे एक संशोधन कोलिन कोह यांनी चीनचा हा व्हिडिओ जाहीर करण्यामागे विशेष हेतू असल्याचं म्हटलं आहे. चीनने हा व्हिडिओ जाहीर करत आपल्या दूरपर्यंत हल्ला करण्याच्या क्षमतेचे प्रदर्शन केले आहे. चीनने या व्हिडिओच्या माध्यमातून अमेरिकेला तैवान आणि दक्षिण चीन समुद्रापासून दूर राहण्याचा इशारा दिला असल्याचं कोलिन यांनी म्हटलंय. 

प्रशांत महासागरातील अमेरिकेचे मोठे सैन्य ठिकाण आहे गुआम

प्रशांत महासागरात असलेला गुआम नौदल बेस चीनपासून जवळ असलेले अमेरिकेचे मोठे सैन्य ठिकाण आहे. या नौदल बेसमुळेच अमेरिका चीन आणि उत्तर कोरियाच्या हालचालींवर लक्ष ठेवू शकतो. सध्या चीनसोबत तणाव वाढल्याने अमेरिकेने या बेसवर मोठ्या प्रमाणात सैन्यसंख्या वाढवली आहे. तसेच आधुनिक लढाऊ विमानेही तैनात केली आहेत. याठिकाणावरुन अमेरिका काही मिनिटांमध्ये दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या अनेक ठिकाणांवर भीषण बॉम्ब हल्ला करु शकते. 

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A bomb attack on a US airport Video shared by China plaaf