जगातिल सर्वात उंच बिल्डिंग बांधणारी कंपनी पडणार बंद; 40,000 जणांना जावं लागणार घरी

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 3 October 2020

कोरोना महामारीमुळे अभूतपूर्व आणि असामान्य अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

अबु धाबी- कोरोना महामारीमुळे अभूतपूर्व आणि असामान्य अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या काळात अनेक उद्योगधंदे बंद पडले, शिवाय अनेक उद्योगधंदे आणि व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तसेच कोरोना काळात अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. अनेक मोठ्या कंपन्यांनी कामगार कपात केली आहे. त्यातच जगातील सर्वात उंच इमारतीच्या उभारणीत शेअर होल्डर असणारी यूएई स्थित Arabtec Holding कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. 

कोरोना काळामुळे कंपनीचे बहुतांश काम बंद पडले आहे. त्यामुळे कंपनीच्या डोक्यावरील कर्जोचा डोंगर वाढला असून कंपनी लवकरच बंद होण्याची शक्यता आहे. या कंपनीत जवळपास 40 हजार कामगार काम करतात, या सर्वांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. Arabtec Holding कंपनीची 1975 साली स्थापना झाली होती. त्यानंतर कंपनीने यूएईत अनेक मोठी बांधकामे केली आहे. यात बुर्ज खलीफा या जगातिल सर्वात उंच इमारतीचाही समावेश होतो. 

विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; अंतिम वर्ष परीक्षेचं वेळापत्रक झालं.

कोरोना महामारीचा सर्व क्षेत्रांना फटका बसला आहे. अनेक देश वाढीव खर्च करणे टाळत आहेत. शिवाय नवीन प्रकल्प हाती घेण्यासही सरकारे नाखूष आहे. याचा फटका बांधकाम क्षेत्राला बसला आहे. यूएई सरकारने खर्च करण्यास आपला हात आखडता घेतला आहे. त्यामुळे अनेक कंपन्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहेत. दरम्यान, यूएईमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या एक लाखांच्या जवळ जाऊन ठेपली आहे. समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत 90 हजार लोकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. 426 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यूएई कोरोनातून बाहेर पडत असला तरी, उद्योदधंद्यांना आणखी काही काळ आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Burj Khalifa builder Arabtec to close down file for liquidation