esakal | अमेरिकेत कॅलिफोर्नियात आगीचं तांडव; मुंबईपेक्षा मोठा परिसर जळून खाक
sakal

बोलून बातमी शोधा

california fire

कोरोनाने थैमान घातल्यानंतर अमेरिकेसमोर आता आणखी एक नैसर्गिक आपत्ती कोसळली आहे. कॅलिफोर्नियात आगीचं तांडव सुरु आहे.

अमेरिकेत कॅलिफोर्नियात आगीचं तांडव; मुंबईपेक्षा मोठा परिसर जळून खाक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कॅलिफोर्निया - सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. याचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला. आता आणखी एक संकट अमेरिकेसमोर निर्माण झालं आहे. गेल्या चार दिवसांपासून कॅलिफोर्नियात आग भडकली आहे. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त 72 तासांमध्ये तब्बल 11 हजार वेळा वीज पडली आहे. यामुळे जवळपास 350 हून अधिक ठिकाणी आग लागली. यातील 23 ठिकाणी आगीचे तांडव सुरु आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दल आटोकाट प्रयत्न करत असून आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे. आग विझवण्यासाठी कार्यरत असलेलं एक हेलिकॉप्टर क्रॅश होऊन दोन पायलट मृत्यूमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली. 

उत्तर कॅलिफोर्नियातील वॅकाविल भागात सर्वाधिक आग पसरली असून इथं 50 हून अधिक घरे जळून खाक झाली आहेत. तसंच हजारो लोकांना सुरक्षेच्या कारणास्तव स्थलांतरीत व्हावं लागलं आहे. तसंच यामुळे वाहतुकीवरसुद्धा प्रचंड ताण आला आहे. आगीमुळे सॅन फ्रॅन्सिस्को शहरात धुळीचे लोट दिसत असून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी केली जात आहे. सध्या कॅलिफोर्नियातील आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे दहा हजारांहून अधिक कर्मचारी प्रयत्न करत आहेत. 

सॅन फ्रॅन्सिस्कोच्या दक्षिण भागात सॅन मटिओ आणि सँता क्रुझ परिसरात 22 हजारांपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्याचे आदेश दिले आहेत. या परिसरात किमान 20 घरं जळाली असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. आतापर्यंत जवळपास 780 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त परिसरात ही आग भडकली आहे. 

अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या जंगलात गेल्याच वर्षी भीषण आग लागली होती. यामध्ये 31 लोकांचा मृत्यू झाला होता तर शेकडो लोक बेपत्ता झाले होते. गेल्या 85 वर्षांच्या इतिहासातील ते सर्वात भीषण असं आगीचं रौद्ररुप होतं. त्याआधी 1933 ला लॉस अँजेलिसच्या ग्रिफिथ पार्कमध्ये आग लागली होती. तेव्हा 83 हजार एकर परिसरात लागलेल्या या आगीमुळे जवळपास 3 लाख लोकांना घर सोडावं लागलं होतं. 

loading image
go to top