ब्रिटननंतर कॅनडामध्ये 'Pfizer लशी'ला मान्यता

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 December 2020

अलिकडेच एका 90 वर्षांच्या आजींना ही लस देऊन ब्रिटनमध्ये आपत्कालीन परिस्थितीतील लसीकरणास सुरवात करण्यात आली आहे.

कॅनडा : ब्रिटननंतर आता कॅनडाने फायझर या कोरोना व्हायरसवरील लशीला मान्यता दिली आहे. वय वर्षे 16 च्या वरील व्यक्तींसाठी ही  लस देण्यात येईल. कॅनडामध्ये मान्यतेनंतर लसीकरणाची प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरु होईल, अशी शक्यता आहे. याबाबतचे वृत्त 'द न्यूयॉर्क टाइम्स'ने दिलं आहे. कॅनडाच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे की, आम्ही लशीच्या सुरक्षिततेबद्दल तसेच तिच्या परिणामकारकतेबद्दल आवश्यक ती सर्व चाचपणी केली आहे.  पुढे आरोग्य विभागाने म्हटलंय की, लशीच्या परिणामकारकतेचा आढावा घेणारी प्रक्रिया कठोर होती तसेच  आमच्याकडे देखरेखीसाठी मजबूत यंत्रणा आहेत, असा विश्वास कॅनेडियन लोकांना वाटू शकतो.

हेही वाचा - पहिली लस नव्वदीतील आजींना; ब्रिटनमध्ये लसीकरणास सुरुवात

याआधी ब्रिटनने या लशीला मान्यता दिली आहे. मात्र, ही मान्यता आपत्कालीन परिस्थितील वापरला दिली गेली आहे. अलिकडेच एका 90 वर्षांच्या आजींना ही लस देऊन ब्रिटनमध्ये आपत्कालीन परिस्थितीतील लसीकरणास सुरवात करण्यात आली आहे.  कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष जस्टीन ट्रुडो यांनी म्हटलंय की, या लशीचे पहिले डोस पुढील आठवड्यात कॅनडाच्या 14 सेंटरवर उपलब्ध होतील. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय की, मंजूरी मिळताच लसीकरणास सुरवात होईल. फायझरकडून कॅनडाने एकूण 6 दशलक्ष डोस मागितले आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या लसीकरणासाठी दोन डोस आवश्यक आहेत. 249,000 डोसचा पहिली ऑर्डर युनायटेड स्टेट्स आणि बेल्जियममधून येईल. 

लहान मुलांसाठी या लशीला मान्यता देण्याआधी चाचणीमधील आलेल्या डाटाची चाचपणी केली जाईल, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. फायझर लशीला मान्यता देणारे कॅनडा हे  ब्रिटननंतरचे दुसरे राष्ट्र ठरले आहे. मार्गारेट किनन या नव्वद वर्षांच्या आजी लस टोचवून घेणाऱ्या जगातील पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत. ‘लस टोचवून घेतलेली पहिली व्यक्ती ठरल्याबद्दल मला आनंद होत आहे. माझ्या वाढदिवसाची ही भेटवस्तूच आहे. माझ्या कुटुंबाबरोबर नाताळसह आणखी काही महत्त्वाचे क्षण साजरे करण्याबाबत मला आता विश्‍वास वाटत आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी लस घेतल्यानंतर दिली. त्यांना २१ दिवसांनंतर लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Canada approves Pfizer COVID-19 vaccine After UK