सीबीआय करतेय एका नाण्याचा तपास; किंमत आहे १२६ कोटी| CBI Investigating | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CBI is investigating coins worth Rs 126 crore

सीबीआय करतेय एका नाण्याचा तपास; किंमत आहे १२६ कोटी

आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल की सीबीआय (CBI) ही यंत्रणा देशातील प्रसिद्ध घोटाळे, खून, बलात्कार, अपहरण या गुन्ह्यांचा तपास करते. परंतु, यावेळी चक्क एक नाणे शोधण्याची जबाबदारी सरकारने सीबीआयकडे सोपवली आहे. नेमकं कोणतं आहे हे नाणं? चला जाणून घेऊया.. (CBI is investigating coins worth Rs 126 crore)

हे नाणे सुमारे ४०० वर्षे जुने १२ किलो वजन असलेले सोन्याचे नाणे (coin) आहे. हे नाणे शेवटचं १९८७ मध्ये हैदराबादचे निजाम मुकर्रम जाह यांच्याकडे होतं असे सांगितले जाते. त्यानंतर पुढे अचानक स्वित्झर्लंडमधून (Switzerland) या नाण्यांच्या लिलावाची बातमी आली आणि तेव्हापासून या नाण्यांविषयी काहीही माहिती मिळाली नाही, असे तज्ञ सांगतात. पण या नाण्यांसाठी सरकार एवढा खटाटोप का करते याविषयीच सविस्तर माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. तसेच हे नाणे हैदराबाच्या निजामापर्यंत कसे पोहोचले, त्याची किंमत काय आहे आणि सरकार त्याचा शोध कसा घेत आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे लेखात दिलेली आहेत.

हा आहे सोन्याच्या नाण्यांचा इतिहास

  • जहांगीरने आपल्या तुझुक-ए-जहांगीरी या आत्मचरित्रात १००० तोला म्हणजेच सुमारे १२ किलो सोन्याचे नाणे नमूद केलेली आहे. जे नाणे त्याने इराणी शाह यांचे राजदूत यादगर अली यांना भेट म्हणून दिले होते.

  • पर्शियन कॅलेंडरनुसार, यादगर अली हा जहांगीरच्या कारकिर्दीच्या ८ व्या वर्षाच्या १९ तारखेला आला होता. इंग्रजी कॅलेंडरनुसार ती तारीख १० एप्रिल १६१२ असू शकते, म्हणजेच या घटनेला आता जवळपास ४१० वर्षे पूर्ण झाली आहेत.

  • या सोन्याच्या नाण्याच्या भव्यतेचे वर्णन करताना यादगर अली यांनी लिहिलंय, कौकब-ए-ताली म्हणजेच सोन्याच्या नाण्याचा व्यास २०.३ सेमी आणि वजन ११,९३५.८ ग्रॅम होते आणि ते आग्रा येथे तयार करण्यात आले होते.

  • हे नाणे तयार करण्यासाठी कारागिरांना खूप पैसे दिले गेले होते. कारण हे फक्त नाणे तयार करायला खूप मेहनत घ्यावी लागली होती. ते नुसते साधे नाणे नव्हते, तर या नाण्यांवर पर्शियन भाषेतील काही सुविचार देखील लिहिलेले होते.

जहांगीरने तयार केलेल्या १२ किलो सोन्याच्या नाण्याचे एकही खरे चित्र नाही. येथे दिलेले चित्र केवळ प्रतीकात्मक आहे. १७ व्या शतकाच्या सुरुवातीला भारतात आलेला इटालियन प्रवासी निकोलाओ मानुची यांनी लिहिले की, अशी नाणी त्या काळी चलनात नव्हती. अशा नाण्यांचा उपयोग मुघल सम्राट फक्त राजदूत आणि विशेष पाहुण्यांना भेट देण्यासाठी करत असत आणि मग नंतर ते पाहुणे या नाण्यांना त्यांच्या संग्रहात मौल्यवान वस्तू म्हणून ठेवत होते. आता प्रश्न असा येतो की जहांगीरने इराणला १२ किलो सोन्याचे नाणे भेट दिले होते, तर ते हैदराबादच्या निजामापर्यंत कसे पोहोचले? याचाच आता सीबीआय शोध घेत आहे.

सीबीआयचे (CBI) माजी सहसंचालक शंतनू सेन यांनी आपल्या पुस्तकात सीबीआयच्या तपासाची माहिती देताना असे लिहितात की, जहांगीरने एकाच वेळी दोन १२ किलो वजन असलेली सोन्याची नाणी बनवली होती. यापैकी एक नाणं हे इराणच्या शाहचा दूत यादगर अली याला भेट देण्यात आलं होतं, तर दुसरं हैदराबादच्या निजामाची मालमत्ता बनून गेलं होतं. हे नाणं निजामापर्यंत पोहोचण्याची गोष्ट खूप रंजक आहे.

ईश्वरदास नगर यांच्या 'फुतुहत-ए-आलमगिरी' या पुस्तकानुसार, १६९५ मध्ये मुघल विजापूर काबीज करण्यासाठी बाहेर पडले. पुढे अचानक त्यांना खाण्यापिण्याची कमतरता भासू लागली. अशा स्थितीत औरंगजेबाचे मनसबदार गाजीउद्दीन खान बहादूर फिरोज जंग, रणमस्त खान, अमानुल्ला खान यांच्या पहारेकरी ५००० बैलगाड्यांवर धान्य टाकून त्याच्यांपर्यंत ते पोहचवण्याचे काम गेले. यामुळे विजापूर जिंकण्यात गुंतलेल्या शाह अलमच्या सैनिकांना हुरूप आला.

पुढे या मदतीची परतफेड औरंगजेबाने गाझिउद्दीन खान बहादूर फिरोज जंग यांना १००० तोळ्याचे सोन्याचे नाणे दिले. हे नाणे गाझिउद्दीनकडून त्याचा मुलगा निजाम-उल-मुल्क असफ जह प्रथम याच्याकडे गेले, जो त्याकाळचा हैदराबादचा पहिला निजाम होता. ईश्वरदार नगरच्या 'फुथुत-ए-आलमगिरी' या पुस्तकात जहांगीरच्या १२ किलो सोन्याचे नाणे हैदराबादच्या निजामपर्यंत पोहोचल्याचा उल्लेख सापडतो.

पुढे हे सोन्याचे नाणं भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत असफ जाहच्या वंशजांकडे होते. त्यानंतर मग हैदराबादचा शेवटचा निजाम मीर उस्मान अली खान यांच्या माध्यमातून हे नाणे त्यांच्या वंशज मुकर्रम जाह यांच्यापर्यंत पोहोचलं. त्यानंतर मग पुढे हळूहळू हे नाणं काळाच्या मागे पडू लागलं. असफ जाह हा हैदराबादचा पहिला निजाम होता, जो औरंगजेबाचा विश्वासू सेनापती होता. जहांगीरने बनवलेले १२ किलोचे सोन्याचे नाणे आसफ जाहचे वडील गाझिउद्दीन खान यांच्यामार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचले होते. पुढे अचानक १९८७ मध्ये १२ किलो सोन्याच्या नाण्याचा शोध कसा सुरू झाला?

१९८७ मध्ये भारत सरकारला स्वित्झर्लंडमधील मौल्यवान सोन्याच्या नाण्याच्या लिलावाची बातमी कळली. तेथे उपस्थित असलेल्या भारतीय अधिकाऱ्यांनी सरकारला सांगितले की, आम्ही हॅब्सबर्ग फेल्डमन एसए, जगातील प्रसिद्ध लिलावकर्ता, जिनिव्हा येथील हॉटेल मोगा येथे ११,९३५.८ ग्रॅम सोन्याच्या नाण्यांचा लिलाव करत आहे.

९ नोव्हेंबर १९८७ रोजी पॅरिसमधील इंडोसेव्ह बँकेच्या जिनिव्हा शाखेच्या मदतीने लिलाव होणार होता. लिलाव होणारे नाणे हे जहांगीरचे १२ किलोचे सोन्याचे नाणे असल्याचे सरकारला कळताच त्यांनी तात्काळ सीबीआयला त्याच्या तपासासाठी स्वित्झर्लंडला पाठवले. सीबीआय स्वित्झर्लंडला गेली पण नाणे सापडलेच नाही. नाण्याच्या शोधात सीबीआय स्वित्झर्लंडला पोहोचली. मात्र, त्याच्या हातात नाण्यांविषयी ठोस असे पुरावे लागलेच नाही. तपासात असे दिसून आले की मुकर्रम जाह १९८७ मध्ये दोन सोन्याच्या नाण्यांचा लिलाव करण्याचा प्रयत्न करत होते. यापैकी एक नाणी १००० तोळा (सुमारे १२ किलो) होती, ज्याची किंमत १९८७ मध्ये सुमारे $१६ दशलक्ष होती. आजच्या दरानुसार, ती किंमत सुमारे १२६ कोटी रुपये आहे.

मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटीच्या एचके शेरवानी सेंटर फॉर डेक्कन स्टडीजच्या इतिहासकार सलमा अहमद फारुकी यांच्या मते, सीबीआयच्या विशेष तपास युनिट XI चे प्रमुख असलेल्या अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यावर १९८७ मध्ये पुरातन वस्तू आणि कला खजिना कायदा, १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याआधी ३७ वर्षांपूर्वी सोन्याचे नाणे शोधण्यात सीबीआय अपयशी ठरली होती, आता सरकारने गेल्या महिन्यात म्हणजेच जूनमध्ये त्याच्या शोधाची जबाबदारी पुन्हा सीबीआयकडे सोपवली आहे. आता त्या नाण्यापर्यंत सीबीआय कधी पोहोचते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: Cbi Is Investigating Coins Worth Rs 126 Crore

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CBISwitzerlandOld Coin