...आणि ट्रम्प अचानक रिसेप्शनला हजर झाले 

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 जुलै 2019

अमेरिकेत मात्र गंमतच घडली. न्यूजर्सी येथील पी. जे. मोंगेली यांचे लग्न ठरले. लग्नाच्या रिसेप्शनचा खर्च बहुधा सासरा करणार असेल म्हणून या नवरदेवाने भरपूर निमंत्रण पत्रिका वाटल्या. एक पत्रिका तर त्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही पाठवून दिली. 

न्यूजर्सी (अमेरिका) : जगाच्या पाठीवर कुठेही नेता व्हायचे असेल तर लग्नाची निमंत्रण पत्रिका असली की नेत्याने त्याला हजर राहावेच लागते. मग ते भारत असो की अमेरिका !  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे खरे म्हणजे जगातील सर्वाधिक 'बिझी' व्यक्तिमत्त्व! त्यांच्या मागे तर विविध देशांच्या पंतप्रधान आणि अध्यक्षांबरोबर बैठका, शिखर परिषदांचा धडाकाच असतो. महत्त्वाची मीटिंग लागली अशी लटकी सबब देऊन लग्नाच्या रिसेप्शनला मुलाला किंवा पी.ए. ला काही नेते पाठवून देतात. 

अमेरिकेत मात्र गंमतच घडली. न्यूजर्सी येथील पी. जे. मोंगेली यांचे लग्न ठरले. लग्नाच्या रिसेप्शनचा खर्च बहुधा सासरा करणार असेल म्हणून या नवरदेवाने भरपूर निमंत्रण पत्रिका वाटल्या. एक पत्रिका तर त्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही पाठवून दिली. 

रविवारी सायंकाळी लग्नाच्या रिसेप्शनचा सोहळा सुरू होता. सोयरे-धायरे आणि मित्र परिवार गोल्फ क्‍लबवरील या सोहळ्यात रमले होते. आणि अचानक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तेथे प्रकट झाले. त्यांना पाहताच टाळ्यांचा कडकडाट झाला. नवरदेव पी. जे. मोंगेली तर एकदम भारावून गेला. ट्रम्प यांनी आधी नवविवाहित जोडप्याचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. 

ट्रम्प नवविवाहित दाम्पत्याजवळ उभे राहिले आणि जमलेल्या वऱ्हाडी मंडळींनी अमेरिका ! अमेरिका ! अशा घोषणा देण्यास सुरवात केली. ट्रम्प देखील अमेरिकेच्या जयघोषात सहभागी झाले. थोडावेळ थांबून ते तेथून रवाना झाले.  नवरदेव पी. जे. ने 'सी.एन.एन' वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले, "आमच्यासाठी हा आश्‍चर्याचा आणि आनंदाचा धक्का होता. आम्ही ट्रंप यांना निमंत्रण पाठवले होते पण ते येतील असे आम्हाला वाटले नव्हते. आम्ही दोघे ट्रम्प यांचे समर्थक आहोत. पण आमचा थेट परिचय फारसा नव्हता.'' भारतातील आणि विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या महाराष्ट्रातील नेते मंडळींनी डोनाल्ड ट्रम्प यांचा आदर्श ठेवायला हवा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chants break out after President Donald Trump crashes MAGA-themed wedding