बेलारुसमधील अराजकता; अखेरच्या हुकूमशहासमोर नारीशक्तीचे आव्हान

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 9 September 2020

बेलारुसमध्ये अनेक शहरांमध्ये, विशेषत: राजधानी मिन्स्कमध्ये दररोज लाखो लोक सरकारविरोधात रस्त्यांवर उतरत आहेत

मिन्स्क- बेलारुसमध्ये अनेक शहरांमध्ये, विशेषत: राजधानी मिन्स्कमध्ये दररोज लाखो लोक सरकारविरोधात रस्त्यांवर उतरत आहेत. अन्याय आणि अत्याचारांविरोधात पेटून उठलेल्या या लोकांना कोरोना विषाणूचा धोका असतानाही आत्मसन्मानाचे जीवन अधिक महत्त्वाचे वाटत आहे. युरोपमधील अखेरचा हुकूमशहा म्हणून ओळखले जाणारे या देशाचे अध्यक्ष अलेक्झांडर ल्युकाशेंको यांच्या राजीनाम्याची मागणी करत गेल्या पाच आठवड्यांपासून हे लोक आंदोलन करत आहेत.

गेली २६ वर्षे देशाच्या नाड्या आवळून ठेवलेल्या ल्युकाशेन्को यांना नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ८०.२३ टक्के मते मिळाली आणि ते सलग सहाव्यांदा सत्तेवर आले. या निवडणुकीत ल्युकाशेन्को यांच्याविरोधात उभ्या राहिलेल्या अनेक उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले किंवा तुरुंगात टाकले गेले. तीन महिलांनी मात्र तीव्र लढा दिला. जीव धोक्यात असतानाही त्या मागे हटल्या नाहीत. अर्थातच, या तिघीही निवडणूक हरल्या. मात्र, न्यायाचा मागमूस शिल्लक नसल्याने यातील दोघींना दुसऱ्या देशात आश्रय घ्यावा लागला असून एकीला आजच सरकारने ताब्यात घेतले आहे. जनतेच्या नेत्या असलेल्या या तिघीही सध्या जनतेपासून दूर आहेत, यातच येथील परिस्थितीचा अंदाज येतो.

'कंपनी द्वेषातून नफा कमावते'; २८ वर्षीय फेसबुक इंजिनिअरने दिला...

मारिया कोलेस्निकोव्हा

आजच बेलारुस आणि युक्रेनच्या सीमेवरून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या दोन सहकारीही दोन दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या इतर सर्व सहकाऱ्यांच्या मागावर पोलिस असून या लोकांचे अपहरण होत आहे, त्यांना मारहाण होत आहे. मारिया यांनाही सरकारने ताब्यात घेतले असले तरी त्यांना कोठे ठेवले आहे, हे कोणालाही माहिती नाही. अध्यक्षीय निवडणुकीतील उमेदवार असलेल्या इतर दोघी निकालानंतर देश सोडून गेल्या असल्या तरी मारिया यांनी देशातच थांबून आंदोलन पेटते ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

स्वेतलाना तिखानोव्हस्काया

मुख्य विरोधक. त्यांचे पती आणि प्रसिद्ध ब्लॉगर सर्जी तिखानोव्हस्की यांना अटक झाल्यावर त्यांच्याऐवजी स्वेतलाना या निवडणुकीत उभ्या राहिल्या. सर्जी यांनीच आंदोलनाची हाक दिली होती. निकालानंतर सरकारची दडपशाही सुरु झाल्याने ल्युथिआनियामध्ये त्यांनी आश्रय घेतला आहे. या निवडणुकीत आपल्याला केवळ ९ टक्के मते मिळाल्याचे सांगणारा निकाल खोटा असल्याचा दावा करत त्यांनी फेरमोजणीचे आव्हान सरकारला दिले आहे. सरकारविरोधातील आंदोलन पेटते ठेवण्याचेही त्या काम करत आहेत.

व्हेरॉनिका सेप्कालो

व्हेरॉनिका या स्वेतलाना यांच्या सल्लागार म्हणून काम पहात होत्या. निवडणुकीला रंग चढत असतानाच त्यांनी रशियात आश्रय घेतला होता. त्यांच्या पतीला निवडणूक लढविण्यापासून बंदी केल्यानंतर त्या रिंगणात उतरल्या होत्या. सध्या कुटुंबाला हानी होण्याच्या भयाने त्या पोलंडला आहेत. निकाला काहीही लागला असला तरी आमच्या अध्यक्षा स्वेतलाना याच आहेत. ल्युकाशेन्को यांना हाकलणे, हेच आमचे ध्येय आहे, असे त्यांनी जाहीर केले आहे.

दिलासादायक! पाटना एम्सच्या कोरोना लसीचा पहिला टप्पा यशस्वी

अलेक्झांडर ल्युकाशेन्को

१९९४ पासून सत्तेत आहेत. पहिली निवडणुक वगळता नंतरच्या पाचही निवडणुकीत गैरप्रकार करून सत्ता कायम ठेवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. भ्रष्टाचार आणि अत्याचाराने पोखरलेली राजवट असूनही रशियाचे पाठबळ असल्याने अद्याप सत्तेवर आहेत. या सरकारला जनता पूर्णपणे कंटाळल्याने, सरकारच्या दडपशाहीने आणि कोरोना संसर्गाला फारसे महत्त्व न देता जनतेला वाऱ्यावर सोडल्याने जनतेचा उद्रेक झाला आहे. आता रशियानेही बेलारुसमधील विरोधकांशी चर्चा सुरु केल्याने ल्युकाशेन्को यांचे धाबे दणाणले असून विरोधकांना फोडण्यासाठी ते जमीन अस्मान एक करत आहेत. महिलांना कधीही महत्त्व न दिलेल्या आणि त्यांना अवमानास्पद वागणूक देणाऱ्या ल्युकाशेन्को यांना आता एकदम तीन कणखर, बुद्धीमान आणि लोकप्रिय महिलांचा सामना करावा लागत आहे.

गेल्या पाच आठवड्यात....
- अनेक विद्यार्थी आंदोलने
- लाखोंच्या संख्येने लोकांचे मोर्चे
- पोलिसी बळाचा पाशवी वापर
- कोणालाही रस्त्यावरून उचलून नेण्यास सुरवात
- अनेकांवर अत्याचार, बलात्कार झाल्याचीही उदाहरणे

मागणी
- ल्युकाशेंको यांचा राजीनामा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chaos in Belarus The challenge of manpower before the last dictator