चीनने जाणूनबुजून कोरोना विषाणू जगभर पसरु दिला; ट्रम्प यांचा गंभीर आरोप

कार्तिक पुजारी
मंगळवार, 21 जुलै 2020

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर पुन्हा एकदा टिकास्त्र सोडलं आहे. चीन कोरोना विषाणूचे संक्रमण रोखू शकला असता, पण त्याने तसं केलं नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर पुन्हा एकदा टिकास्त्र सोडलं आहे. चीन कोरोना विषाणूचे संक्रमण रोखू शकला असता, पण त्याने तसं केलं नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही महिन्यांपासून कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चीनवर टीका करत आले आहे. कोरोना विषाणू जगभर पसरण्यासाठी त्यांनी बिजिंगला जबाबदार धरलं आहे.

दिल्लीकर हर्ड इम्युनिटीच्या जवळ! इतके टक्के लोकांना झालाय आतापर्यंत कोरोना
चीनच्या अक्षमतेमुळे आज जगभरात लाखो लोक मरत आहेत. विषाणू चीनमधूल आला. त्यांनी या विषाणूला देशाबाहेर जाऊ द्यायला नको होतं. त्यांना हा प्रसार थांबवणे सहज शक्य होतं. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी हा भयंकर विषाणू जगभर पसरू दिला, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत. ते व्हाईट हाऊस येथे पत्रकारांशी बोलत होते.

जगभरात आतापर्यंत १.४ कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत ६ लाखांपेक्षा अधिक रुग्णांचा यामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेला कोरोना विषाणूने सर्वाधिक पछाडले आहे. अमेरिकेत आतापर्यंत ४० लाखांपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर १ लाख ४३ हजार अमेरिकी नागरिकांचा कोरोनाने जीव घेतला आहे. शिवाय अमेरिकेत कोरोनाचा प्रकोप वाढतच आहे. दररोज देशात ६० हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळत आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था या विषाणूमुळे पूर्णपणे थांबली आहे.

चीनला या विषाणूच्या प्रकोपाची जाणीव होती. पण त्याने जाणूनबुजून या विषाणूला पसरू दिलं. त्यामुळे अमेरिकेत आणि युरोपमध्ये हा विषाणू पसरला. त्यांनी हे थांबवायला पाहिजे होतं. ते सुरुवातीपासून प्रामाणिक राहिले नाहीत. त्यांनी कोरोना विषाणूबाबतची माहिती दडवून ठेवली, असं ट्रम्प म्हणाले आहेत.

राजीव गांधींची मारेकरी नलिनीचा कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न
आपण सर्व एकत्र आहोत, मी गेल्या आठवड्यात अनेक देशांच्या नेत्यांशी बोललो आहे. आपण सर्व मिळून याचा मुकाबला करुया. आम्ही अनेक देशांना व्हेंटिलेटर पुरवत आहोत. अनेक देशांना मदत करत आहोत. ज्या देशांमध्ये व्हेंटिलेटरचा तुटवडा आहे, अशांना हजारो व्हेंटिलेटर पाठवत आहोत. पण लोकांनी समजून घेतलं पाहिजे की, हे चीनमुळे निर्माण झालेलं जागतिक संकट आहे, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

दरम्यान, चीनने डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या आरोपांचे वारंवार खंडन केले आहे. आम्ही कोरोना विषाणूची कोणतीही माहिती लपवण्याचा प्रयत्न केला नाही. उलट अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लोकांचे लक्ष हटवण्यासाठी आमच्यावर आरोप करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China Chose Not To Stop COVID-19 From Spreading Across The World