रशियानंतर आता चीनची लस तयार? वाचा सर्वसामान्यांना कधी मिळणार

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 15 September 2020

जगभरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनावर प्रभावी ठरणारी लस केव्हा तयार होईल आणि ती केव्हा सर्वसामान्यांना उपलब्ध होईल, असे प्रश्न अनेकांना पडत आहेत.

बिजिंग- जगभरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनावर प्रभावी ठरणारी लस केव्हा तयार होईल आणि ती केव्हा सर्वसामान्यांना उपलब्ध होईल, असे प्रश्न अनेकांना पडत आहेत. रशियाने कोरोनावर लस तयार केल्याचा दावा केला आहे. तसेच त्याने स्पुतनिक V लस आपल्या काही नागरिकांना उपलब्धही करुन दिली आहे. त्यांतर आता चीननेही लस निर्मितीच्या कामात प्रगती केल्याची माहिती आहे. कारण चीनची लस नोव्हेंबरमध्ये आपल्या नागरिकांना उपलब्ध होईल, असं तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले.

माजी नौदल अधिकारी मदन शर्मा भेटले राज्यपालांना; भेटीनंतर काय दिली प्रतिक्रिया,...

कोविड लस नोब्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल, असं चायना सेंटर फॉर डिसिझ कंट्रोल आणि प्रिवेन्शन संस्थेच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे. चीनच्या चार कोरोना लशी मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. यातील तीन लशी याआधीच जोखमीच्या परिस्थितीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. आता नोव्हेंबरमध्ये सर्व नागरिकांना लस देण्याचा तयारी केली जात आहे. CanSino Biologics कंपनीची लस जूलैमध्ये चीनच्या सैनिकांना देण्यात आली होती.

चीनचे वैद्यकीय अधिकारी गायझेन वू यांनी एका राज्य माध्यमाला मुलाखत दिली होती. यात त्यांनी कोरोना लशीची चाचणी सुरळीत पार पडत असल्याचं सांगितलं. तसेच २०२० मध्येच ही लस नागरिकांना मिळणे सुरु होईल, असं ते म्हणाले. लशीचा डोस देण्यात आलेल्या स्वयंसेवकांमध्ये कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत. एप्रिलमध्ये स्वयंसेवकांना लस टोचण्यात आली होती, असं त्यांनी सांगितलं. मात्र, चारपैकी कोणती लस नोव्हेंबरपर्यंत तयार होईल, याबाबतचा खुलासा त्यांनी केलेला नाही. 

दरम्यान, जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शिवाय कोरोना रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातील वैज्ञानिक कोरोनावर प्रभावी लस तयार करण्याच्या कामात गुंतले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार सध्या १०० पेक्षा अधिक उमेदवार कोरोना लस निर्माण करत आहेत. यातील ८ उमेदवारांनी मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यातपर्यंत मजल मारली आहे. दुसरीकडे रशियाने कोरोनावरील पहिली लस तयार केल्याचा दावा केला आहे. 

राज्यात सप्टेंबर महिन्यात शाळा सुरु होणार?, शिक्षणमंत्री म्हणतात...

कोरोनाचे संकट भयंकर बनत असल्याने लस लवकर निर्माण करण्यासाठी वैज्ञानिकांवर दबाव येत आहे. अशात लशीच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होऊ नये याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. कोणतीही लस तयार करायची तर त्यासाठी कमीतकमी १२ ते १८ महिन्यांचा कालावधी लागतो, असं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे सुरक्षेकडे दुर्लक्ष करणे लोकांच्या जीवावर बेतू शकतं. 

(edited by- kartik pujari)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China Coronavirus Vaccine May Be Ready For Public soon