चीनने माझ्या लहान मुलीला डांबून ठेवण्याची दिली होती धमकी; ऑस्ट्रेलियाच्या पत्रकाराचा खुलासा

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 21 September 2020

सध्या चीनचे इतर अनेक देशांप्रमाणेच ऑस्ट्रेलियाबरोबरील संबंधही तणावाचे झाले आहेत.

कॅनबेरा- चीनकडून मानहानिकारक वागणूक मिळाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने त्यांच्या सर्व पत्रकारांना चीनमधून काही दिवसांपूर्वीच माघारी आणले. चीनने येथील विदेशी पत्रकारांना अनेक वेळा धमक्या दिल्याचे चीनमध्ये काम करण्याचा अनुभव असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या पत्रकारांनी सांगत चीन सरकारचा चेहरा उघड पाडला आहे. सध्या चीनचे इतर अनेक देशांप्रमाणेच ऑस्ट्रेलियाबरोबरील संबंधही तणावाचे झाले आहेत.

मॅथ्यू कार्नी हे २०१८ मध्ये चीन सोडून ऑस्ट्रेलियाला परत आले होते. त्यावेळी त्यांना आणि त्यांच्या १४ वर्षांच्या मुलीला डांबून ठेवण्याची धमकी चीन सरकारने दिली होती, असा आरोप कार्नी यांनी केला आहे. ऑस्ट्रेलिया आणि चीनमधील राजनैतिक संबंध बिघडायला नको म्हणून दोन वर्षे आपण काही बोललो नव्हतो, असा खुलासाही कार्नी यांनी केला आहे. ऑस्ट्रेलियाने दोन वर्षांपूर्वी स्थानिक राजकारणात विदेशी हस्तक्षेपास विरोध करणारा कायदा मंजूर करून घेतला त्यावेळी कार्नी हे ‘एबीसी’ या वृत्तसंस्थेचे चीनमधील प्रमुख होते. या कायद्यामुळे चीन सरकार संतापले होते. 

नौदलाचं ऐतिहासिक पाऊल; युद्धनौकेवर पहिल्यांदाच महिला अधिकारी तैनात

कार्नी यांच्या म्हणण्यानुसार, या कायद्यानंतर चीन सरकारने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना अनेक प्रकारे धमक्या देण्यास सुरवात केली होती. चीनच्या अधिकाऱ्यांनी त्यावेळी कार्नी आणि त्यांच्या १४ वर्षांच्या मुलीवर व्हीसा नियमांचा भंग केल्याचा आरोप केला होता. चीनच्या कायद्यानुसार १४ वर्षांच्या मुलीला सज्ञान समजले जाते. मात्र कार्नी यांच्या मुलीच्या व्हीसावर अल्पवयीन असल्याचे लिहिले असल्याने हा गुन्हा समजण्यात येऊन तिला अज्ञात स्थळी चौकशीसाठी ताब्यात घेतले जाऊ शकते, अशी धमकी कार्नी यांना मिळाली होती.

चीनकडून अशी धमकी मिळाल्यानंतर कार्नी यांनी दुसऱ्याच दिवशी कुटुंबासह ऑस्ट्रेलियाला परतण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, चिनी अधिकाऱ्यांनी परवागनी नाकारली होती. अखेर दूतावासाने केलेल्या मध्यस्थीनंतर न केलेला गुन्हा कबूल करत कार्नी यांना ऑस्ट्रेलियातून काढता पाय घ्यावा लागला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China had threatened me Australian journalist revelation