चेंगडूचा दूतावास बंद करा; अमेरिकेविरुद्ध चीनचे जशास तसे डावपेच 

वृत्तसंस्था
Saturday, 25 July 2020

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार दूतावासाला नोटीस बजावण्यात आली आहे.दूतावासाच्या जागेचा आणि कामकाज चालविण्याचा परवाना काढून घेण्याचा निर्णय झाला.

बीजिंग- ह्युस्टनमधील वकिलात बंद करण्याचे फर्मान अमेरिकेने काढल्यानंतर चीनने अपेक्षेप्रमाणे जशास तसे प्रत्यूत्तर दिले. चेंगडूमधील अमेरिकी वाणिज्य दूतावास बंद करावा असा हुकूम चीनने शुक्रवारी काढला. 

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार दूतावासाला नोटीस बजावण्यात आली आहे. दूतावासाच्या जागेचा आणि कामकाज चालविण्याचा परवाना काढून घेण्याचा निर्णय झाला. सर्व प्रकारचे व्यवसाय आणि उपक्रम थांबविण्यासाठी विशिष्ट अटींचा तपशील देण्यात आला. 

ह्युस्टनमधील वकिलात बंद करण्याचे फर्मान अमेरिकेने काढल्यानंतर चोख प्रत्यूत्तर दिले जाईल असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेनबीन यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार कार्यवाही झाली. 

हस्तक्षेपाचा दावा 
अमेरिकी वकिलातीच्या अधिकाऱ्यांनी चीनच्या अंतर्गत व्यवहारांत हस्तक्षेप केला. राजनैतिक भूमिकेला अनुसरून नसलेल्या कामांमध्ये ते गुंतले. तसे आम्ही त्यांना वेळोवेळी सुचित्त केले होते, असा दावा वेनबीन यांनी केला. 

निर्णय मागे घ्यावा 
दरम्यान, ह्युस्टनच्या वकिलातीबाबतचा निर्णय तातडीने मागे घ्यावा. द्विपक्षीय संबंध पूर्वपदावर आणण्यासाठी आवश्यक अशी परिस्थिती निर्माण करावी, असेही चीनने म्हटले आहे. 

तीन दिवसांची मुदत 
अमेरिकेने चीनी वकिलातीला तीन दिवसांची मुदत दिली होती. तसेच चीनने केले आहे. ग्लोबल टाइम्स या सरकारी मुखपत्राचे मुख्य संपादक हु शिजीन यांच्या ट्वीटनुसार चीननेही तीनच दिवसांची म्हणजे 72 तासांची मुदत दिली आहे. 24 जुलै रोजी सकाळी दहा वाजता नोटीस बजावण्यात आली असून 27 तारखेला सकाळी दहा वाजेपर्यंत दूतावास बंद केला जाईल. 

मोठा बंदोबस्त 
शुक्रवारी दुपारपासून वकिलातीच्या इमारतीबाहेर अनेक पोलिस, साध्या वेशातील अधिकारी तसेच पीपल्स लिबरेशन आर्मीचे जवान बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले. त्यांनी त्या परिसरातील लोकांचे फोन तपासून विशिष्ट फोटो डिलीट करण्यास बजावले. 

सरकारी वाहिनीलाच परवानगी 
पोलिसांनी बहुतांश पत्रकार आणि पादचाऱ्यांना त्या परिसरातून निघून जाण्यास फर्मावले. केवळ सीजीटीएन (चायना ग्लोबल टेलीव्हीजन नेटवर्क) या सरकारी दूरचित्रवाहिनीलाच वार्तांकनाची परवानगी होती. 

ह्युस्टनची वकिलात बंद करण्याचा अमेरिकेचा निर्णय एकतर्फी होता. त्यांच्या अवाजवी कृतीस आम्ही प्रत्यूत्तर देणे गरजेचे होते. त्यामुळे आमचा निर्णय कायदेशीर आहे. 
- वँग वेनबीन, चीनी परराष्ट्र प्रवक्ते 

चेंगडू वकिलात अन्् तिबेटचा संदर्भ 
- चेंगडू ही चीनच्या नैऋत्येकडील सिचुआन प्रांताची राजधानी 
- 8 कोटी 11 लाख लोकसंख्या जर्मनीपेक्षा (8 कोटी 30 लाख) जास्त 
- सिचुआन प्रांत तिबेटलगत 
- वुहानमधील वकिलातीच्या तुलनेत चेंगडू वकिलात म्हणूनच अमेरिकेसाठी महत्त्वाची 
- शांघाय, हाँगकाँग या महत्त्वाच्या आर्थिक केंद्रांतील वकिलातींच्या तुलनेत मात्र चेंगडूला महत्त्व कमी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China orders closure of US consulate in Chengdu