चीन सरकारचा नागरिकांच्या जिवाशी खेळ; लाखो लोकांना दिली कोरोना लस

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 26 September 2020

कोविड विषाणूला रोखण्यासाठी अनेक देश कोरोनावरील प्रभावी लस निर्माण करण्याच्या कामात गुंतले आहेत.

बिजिंग- कोरोना महामारी जगभरात थैमान घालत आहे. कोविड विषाणूला रोखण्यासाठी अनेक देश कोरोनावरील प्रभावी लस निर्माण करण्याच्या कामात गुंतले आहेत. अशात अनेक देशांच्या कोविड लशी मानवी चाचणीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. असे असले तरी कोविड लस सार्वजनिकरित्या देणे सुरु करण्यात आलेले नाही. तिसऱ्या टप्प्यामध्ये कोरोना लशीची सुरक्षितता पाहिली जाते. या लशीचे दुष्परिणाम दिसत नाहीत ना याची खातरजमा केली जाते. मात्र, चीनने लशीला मान्यता मिळण्याआधीच आपल्या नागरिकांना लस देण्यास सुरुवात केली आहे. 

लडाखनंतर जम्मू-काश्मीरमध्ये अस्थिरता पसरवण्याचा चीनचा डाव

चीनच्या चार कंपन्या कोरोनावरील लस निर्माण करण्यात आघाडीवर आहेत. त्यातील दोन कंपन्या या मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्या असल्याचं सांगितलं जातंय. तिसऱ्या टप्प्यातून समाधानकारक निकाल येण्याआधीच चीनने लशीचा वापर सुरु केला आहे. चीनने जून महिन्यापासून आणीबाणीच्या नावाखाली लाखो लोकांना लस दिली असल्याचं सांगितलं जातंय. जून महिन्यात चिनीमधील अनेक मोठ्या अधिकाऱ्यांना कोरोना लस देण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या.

चीनच्या आरोग्य मंत्रालयानुसार, देशात कोरोना विषाणूचा प्रभाव बऱ्यापैकी कमी झाला आहे. पण, पुन्हा कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. असे असताना आणीबाणीच्या नावाखाली लाखो लोकांना कोरोना लस का दिली जात आहे, असा प्रश्न तज्ज्ञांकडून विचारला जात आहे. कोरोना लशीचा डोस दिल्यानंतर शरिरात दुष्परिणाम दिसून आल्याचं अनेक चिनी लोकांचे म्हणणे आहे. 

किम जोंग यांना कोणत्याही अटींशिवाय भेटण्याची तयारी; जपानच्या नवनियुक्त...

चीनने आतापर्यंत किती लोकांना कोरोना लशीचा डोस दिला याबाबत माहिती नाही. मात्र, काही दाव्यानुसार, सिनोफार्म Sinopharm subsidiary CNBG कंपनीची लस जवळजवळ 3 लाख 50 हजार लोकांना देण्यात आली आहे. तसेच 40 हजार स्वयंसेवकांना या लशीचा डोस देण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. 

कोरोना लस निर्मिती करणारी आणखी एक कंपनी सिनोवॅकने आपल्या 90 टक्के कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोरोना लस दिल्याचं जाहीर केलं होतं. याशिवाय सिनोवॅक कंपनीने लाखांपेक्षा अधिक लशी सरकारला पुरवली असल्याचं सांगण्यात आलंय. आणखी एका उमेदवाराची लस लष्करासाठी मंजूर करण्यात आली आहे. त्याअंतर्गत चिनी सैनिकांनी ही लस देण्यात येत आहे. 

अनेक चिनी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना देण्यासाठी कोरोना लशीची मागणी केली आहे. त्यामुळे पूर्ण सुरक्षिततेची खात्री न होताच चीन आणीबाणीच्या नावाखाली आपल्या अनेक नागरिकांना लशीचा डोस देत असल्याचं दिसत आहे. चीनने 2021 पर्यंत 100 कोटी डोस तयार करण्याची तयारी असल्याचं म्हटलं आहे. 

(edited by- kartik pujari)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China pushes emergency use of Covid vaccine despite concerns