
ज्यो बायडेन यांचा विजय झाल्यावर जगभरातून त्यांचे अभिनंदन होत असताना चीनने मात्र बायडेन यांना विजयी उमेदवार म्हणून स्वीकारण्यास तूर्त नकार दिला आहे.
बीजिंग - अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांचा विजय झाल्यावर जगभरातून त्यांचे अभिनंदन होत असताना चीनने मात्र बायडेन यांना विजयी उमेदवार म्हणून स्वीकारण्यास तूर्त नकार दिला आहे. अमेरिकेच्या कायदेशीर प्रक्रियेनुसार निकाल अद्याप जाहीर झालेला नाही, असे कारण चीनने दिले आहे. यामुळे चीन आणि अमेरिका वाद सत्तांतरानंतरही निवळण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी तीन नोव्हेंबरला झालेल्या निवडणुकीत ज्यो बायडेन आणि कमला हॅरिस विजयी झाल्याचे चार दिवसांच्या मतमोजणीनंतर दिसून आले आहे. विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हार मान्य केलेली नसून काही राज्यांमधील मतमोजणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. तसेच, बायडेन यांच्या नावाची ‘नियोजित अध्यक्ष’ अशी घोषणाही झालेली नाही. चीनमधील माध्यमांनी या निवडणुकीचे बऱ्यापैकी वार्तांकन केले आणि मतमोजणीनंतर विश्लेषणही केले. मात्र, सरकारने अभिनंदन अद्याप केलेले नाही. याबाबत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेनबिन यांना विचारले असता त्यांनी, ‘बायडेन यांना माध्यमांनी विजयी घोषित केल्याची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अमेरिकेच्या कायद्यानुसार आणि अधिकृत प्रक्रियेनुसार निवडणुकीचा निकाल जाहीर होईल, अशी आमची समजूत आहे,’ असे सांगितले.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अमेरिकेतील निवडणुकीबाबत चीन आपले निवेदन कधी करणार किंवा विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांची भूमिका स्पष्ट करेपर्यंत वाट पाहणार का?, असे वेनबिन यांना विचारण्यात आले. यावर त्यांनी ‘आम्ही आंतरराष्ट्रीय शिष्टाचाराचे पालन करू,’ इतकेच सांगितले.