'आता कसं वाटतंय?' US Capitol घटनेवर चीनच्या अमेरिकेला कानपिचक्या; इराण, रशियाचेही टोमणे

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 January 2021

चीनने म्हटलंय की, अमेरिकेत जे काही काल घडलं ती त्यांच्याच कर्माची फळे असून अमेरिकेत लोकशाहीच्या भ्रमाचा भोपळा फुटला आहे.

नवी दिल्ली : अमेरिकेत काल कॅपिटल हिलमध्ये घडलेली हिंसाचाराची घटना ही अभूतपूर्व अशी होती. या घटनेचे पडसाद जगभरात उमटणे स्वाभाविक होते. तसे ते उमटलेही. अमेरिकेतील या हिंसाचाराचा निषेध सगळीकडूनच झाला. मात्र, चीनसारख्या देशाने अमेरिकेत घडलेल्या घटनेवरुन तोंडसुख घेतलं आहे तसेच अमेरिकेला टोमणे देखील लगावले आहेत. चीनमधील सरकारी वृत्तसंस्था ग्लोबल टाइम्सने अमेरिकेची थेट खिल्लीच उडवली आहे. तर रशियाने या घटनेला कमकुवत होत चाललेल्या लोकशाहीचं द्योतक असं संबोधलं आहे.

हेही पहा - अमेरिकेतील US Capitol मध्ये नेमकं काय आणि का घडलं?

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या सरकारी वृत्तपत्राने म्हणजेच ग्लोबल टाइम्सने अमेरिकेतील घडलेल्या हिंसाचारावर एक टीका करणारा लेख प्रकाशित केला आहे, अमेरिकेत जे काही काल घडलं ती त्यांच्याच कर्माची फळे असून अमेरिकेत लोकशाहीच्या भ्रमाचा भोपळा फुटला आहे. हाँगकाँगमध्ये जेंव्हा आंदोलन झालं होतं तेंव्हा अमेरिकेने आंदोलकांच्या धैर्याचं कौतुक करत त्याला सुंदर दृश्य असं म्हटलं होतं.

त्याचाचा वचपा काढत चीननेही आता कालच्या घटनेला सुंदर दृश्य म्हणून संबोधलं आहे. चीनच्या ग्लोबल टाइम्सने यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये अमेरिकेतील घटनेशी चीनच्या घटनांशी तुलना केली आहे. अमेरिकेकडून आलेल्या प्रतिक्रियांना कालच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जशास तसे उत्तर दिलं गेलं आहे. 

तर इराणच्या सरकारी वृत्त एजन्सी अर्थात इस्लामिक रिपब्लिकनुसार, इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेतील हिंसाचारावरुन डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. राष्ट्राध्यक्ष हसन रुहाणी यांनी म्हटलं की, एक लोकप्रिय नेता आपल्या देशाची बदनामी कशी करु शकतो तसेच एक चुकीचा माणूस संपूर्ण जगासोबत अमेरिकेचे संबंध कसे खराब करु शकतो यांचं हे उदाहरण आहे, अशा आशयाची टीका त्यांनी केली आहे. 

तर तिकडे रशियाने या घटनेवरुन अमेरिकेच्या प्रगल्भ लोकशाहीच्या बिरुदावलीवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. फॉरेन अफेअर्स कमिटीचे प्रमुख असलेले खासदार कॉन्सटनटीन खुश्चेव यांनी म्हटलंय की, अमेरिकेची लोकशाही अडखळत असल्याचं स्पष्ट आहे. आणि ती लवकरच कोसळेल असं मी कोणत्याही संशयाविना सांगू शकतो. अमेरिकेचा आव जगाला दिशा देण्याचा  होता मात्र स्वत: अमेरिका कुठल्या दिशेला चालला आहे, हे त्यालाही माहिती नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: china russia and iran ridicules the us capitol violence incident