
चीनमध्ये २६ शहरांत लॉकडाउन
बीजिंग : चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असतानाही अपेक्षेप्रमाणे प्रशासनाला यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे. चीनमध्ये सध्या २६ शहरांत लॉकडाउन असून सुमारे २१ कोटी नागरिक घरात बंदिस्त आहेत. १ मे रोजी कामगार दिनानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमावरही बंदी घालण्यात आली होती. चीनच्या सात दशकांच्या इतिहासात प्रथमच या शहरांत कामगार दिनाचे कार्यक्रम पार पडले नाहीत.
कोरोनामुळे चीनमधील बहुतांश भागातील जनजीवनावर व्यापक परिणाम झाला आहे. सामूहिक चाचणीसाठी लोकांना घराबाहेर पडण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यानंतर नागरिक शांघायमध्ये फिरताना दिसले आणि नंतर मॉलमध्ये खरेदीसाठी रांगेत उभे राहिले. चीनमधील नव्या व्हेरिएंटचा तपास लावण्यासाठी सामूहिक चाचणीची मोहीम राबविली जात आहे. आर्थिक राजधानी शांघाय येथे कडक लॉकडाउन असताना बीजिंगमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी होत नसताना अध्यक्ष शी जिनिपिंग यांनी मात्र मौन बाळगले आहे. एप्रिल महिन्यांत जिनिपिंग यांनी अनेक सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घेतला, परंतु कोरोना आणि लॉकडाउनबाबत कोणतेही वक्तव्य केले नाही. चीनमधील अनेक शहरात लॉकडाउन असल्याने लोकांचे खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. त्यामुळे जिनिपिंग यांनी सुमारे ७५ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना मदतकार्यात सहभागी केले असून त्यानुसार नागरिकांना अन्नधान्य वितरित केले जात आहे.
दोन महिन्यांपासून शाळा बंद
चीनच्या झिजिंगयान, जिलिन, शांघाय, बीजिंगसह ८ प्रांतात तब्बल दोन महिन्यांपासून शाळा बंद आहेत. या प्रांतात ओमिक्रॉनमुळे संसर्गाचे प्रमाण कायम राहत आहे. जिनिपिंग सरकारने या प्रांतातील प्राथमिक शाळांतील मुलांची चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. घरी जाऊन मुलांची तपासणी केली जात आहे.
Web Title: China Update Corona China Lockdown 26 Cities Beijing
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..