
Nutella Chocolate : जगप्रसिद्ध नटेला चॉकलेटचा मालक का राहला प्रसिद्धीपासून लांब?
Nutella Chocolate : माणूस आपल्या मागे काय ठेवून जातो?... आपले काम. आपण निर्माण केलेली गोष्ट! अर्थातच, एखाद्या माणसाने निर्माण केलेली चव, तो जगात नसतानाही, हजारो जणांच्या जिभेवर राज्य करते. मिकॅले फेरेरो याने तयार केलेली चॉकलेटस् आजही लोकांना आवडतात.
दुसरे महायुद्ध संपल्यानंतर इटलीमध्ये छोट्या-छोट्या उद्योगांना सुरुवात झाली. मिकॅलेच्या आईचे एक छोटेसे पेस्ट्री तयार करण्याचे दुकान होते. त्याचे वडीलही त्यासाठी आईला मदत करत असत. त्यावेळी तरुण मिकॅले त्या दुकानात जात असे. हळूहळू या दुकानाचे त्याच्या आई-वडिलांनी कॅंडी तयार करण्याच्या कारखान्यात रूपांतर केले. त्याचे वडील अचानकच वारले. सगळी जबाबदारी मिकॅलेवर येऊन पडली. (chocolate day Nutella Chocolate history life story of Michele Ferrero )
त्याच सुमारास चॉकलेट बनवणे खूप अवघड झाले. कारण, दुसऱ्या महायुद्धानंतर कोको पावडर मिळणे दुरापास्त झाले. एकतर चॉकलेटचा कारखाना बंद करण्याची वेळ आली, किंवा दुसरे कोणते तरी उत्पादन तयार करावे, असे मिकॅले याने ठरवले.
त्यावेळी हेझलनट इटलीमध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध होती. या हेझलनटचा वापर करून मिकॅलेने चॉकलेट स्प्रेड बनवले. कमीत कमी कोको पावडरचा वापर करून तयार झालेले हे उत्पादन अल्पावधीतच सर्वांना आवडले. त्याला ‘नटेला’ असे संबोधले गेले. हळूहळू मिकॅलेने नवनवीन उत्पादने तयार करायला सुरुवात केली.
अमेरिकन स्त्रियांची मानसिकता लक्षात घेऊन त्याने ‘टिक टॅक’ हे कमी कॅलरीचे चॉकलेट तयार केले. केवळ दोन कॅलरी असणारे हे चॉकलेट महिलांमध्ये खूप लोकप्रिय झाले. मिकॅलेने संपूर्ण युरोपात आपली तगडी वितरण व्यवस्था निर्माण केली. त्याच्या उत्पादनांना त्याने नवनवीन मार्केट शोधले. युरोपमधील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत माणूस तो बनला.
तरुणपणातच आपल्या एका मुलाचे अपघाती निधन त्याला पाहायला लागले. अशा सर्व घटनांमधून तो पुन्हा ताकदीने वर आला. त्याचा ब्रँड मोठा होत गेला. एका छोट्याशा गावात सुरू झालेला त्याचा प्रवास जगातला श्रीमंत माणूस बनण्यात संपन्न झाला.
डोळ्यांवर नेहमी काळा गॉगल लावणारा मिकॅले प्रसिद्धीपासून त्याच्या आयुष्यात दूरच राहिला. त्याने उभा केलेले औद्योगिक साम्राज्य एका अशा सुमधूर स्वप्नाची गोष्ट आहे, जे स्वप्न अथक मेहनतीतून साकार झाले आहे.