Cleanest village : स्वच्छतेची सवय आणि सवयीचं पर्यटन; आशियातील सर्वांत स्वच्छ गावाची कहाणी

रस्त्यावर झाडाचा पालाही दिसणार नाही. पाला साफ करणाऱ्या महिला कर्मचारीही दिसतच
Cleanest village
Cleanest villagesakal

मॉलिलोंग - पर्यटन विकास हा प्रकार नवा नाही. केंद्र सरकारने मागील काही वर्षांपासून पर्यटनस्थळांच्या विकासावर भर दिला आहे. या अंतर्गत, पर्यटकांना आकर्षित करण्याच्या उद्देशानं अनेक ठिकाणांचा विकास केला जात आहे. पण, पर्यटनस्थळ म्हणून एखादं ठिकाण आधीपासूनच नैसर्गिकरित्या परिपूर्ण असणं, आणि त्यातही अख्खं गाव हेच आकर्षणाचा केंद्र असणं, हे दुर्मिळ उदाहरण आहे.

मेघालयमधील मॉलिलोंग हे गाव त्यापैकीच एक आहे आणि स्वच्छता हाच या गावाचा ‘यूएसपी’ आहे. आशियातील सर्वांत स्वच्छ गाव म्हणून मॉलिलोंग परिचित आहे. पण या गावाने हे साध्य कसं केलं, स्वच्छता राखण्यात इतकं सातत्य कसं, याचं काही प्रमाणात उत्तर केंद्र सरकारच्या पत्र सूचना कार्यालयाने महाराष्ट्रातील माध्यम प्रतिनिधींसाठी आखलेल्या दौऱ्यादरम्यान शोधण्याचा प्रयत्न केला. आसाम-मेघालयातील विविध विकास प्रकल्पांची, कामकाजाची, पर्यटनस्थळांची माहिती उर्वरित राज्यांतील जनतेला व्हावी, या उद्देशाने ‘पीआयबी’ने आम्हाला इथं आणलं आहे. त्याअंतर्गत मेघालयातील मॉलिलोंग गावात आलो होतो. सुंदर चित्र असावं, तसंच हे गाव आहे.

रस्त्यावर झाडाचा पालाही दिसणार नाही. पाला साफ करणाऱ्या महिला कर्मचारीही दिसतच होत्या. ‘गॉड्स ओन गार्डन’ म्हणून ओळखलं जाणारं गाव टापटीप आहे. आम्ही त्या गावाच्या प्रमुखाला म्हणजे ‘गावबुढा’ला (बुढा आणि वय या दोन शब्दांचा इथं संबंध नाही, वयानं तरुण असलेला गावाचा प्रमुख झाला तरी तो बुढाच.) स्वच्छतेबाबत विचारलं तर, ते म्हणाले की हीच पूर्वीपासून सवय आहे. कचरा जमा झालाच तर तो गोळा करून शिलॉंगला आणून कचराकुंडीत टाकला जातो. पालापाचोळा जमा होतो, त्याचं खत बनवलं जातं. स्वच्छता हा पर्यटन खेचणारा मुद्दा ठरू शकतो, हे मॉलिलोंगनं सिद्ध केलंय. इतरांनाही संधी आहेच. पण ती भावना मनापासून आणि सर्वांच्याच मनात यायला हवी. नाहीतर बातम्या आणि पुस्तकं वाचून जग कधीच बदललं असतं.

स्वच्छतेसाठी सर्वांचाच पुढाकार

दीडशे घरं आणि पाचशे लोक, एवढाच विस्तार असलेल्या या गावात जागोजागी बांबूपासून बनवलेल्या कचराकुंड्या आहेत. दररोज रस्ते साफ करायला सहा ते सात पगारी महिला आहेत. शिवाय, आठवड्यातून एकदा गावातील सर्व लोक गाव साफ करतात. गावात तंबाखू बंदी आहे. हे गाव १५-२० वर्षांपूर्वी प्रसिद्धीच्या झोतात आलं. तेव्हापासून पर्यटकांची ये-जा सुरू झाली. आताही पर्यटन हंगामात दररोज ५०० आणि इतर वेळी रोज किमान २०० जण गाव पाहायला येतात.

सगळे परत गावातच येतात

मॉलिलोंग गावात माध्यमिकच्या पुढे शाळा नाही. त्यामुळे शिक्षण घेण्यासाठी मुलं-मुली शिलॉंग किंवा इतर शहरांत जातात. पण बहुतेक सगळे पुन्हा गावीच परततात. या तरुणांच्या मनातही गावाचा विकास हाच उद्देश आहे. शिक्षणाला प्रोत्साहन, शाळा सोडून देण्याचं प्रमाण कमी करणे, यासाठी काम करण्याची त्यांची इच्छा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com