Himachal Pradesh Weather Update : हिमाचलमध्ये ढगफुटी; दोघींचा मृत्यू; दुकाने वाहून गेली, गाड्या पाण्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cloudburst in Himachal two died Shops were washed away damage vehicle

Weather Update : हिमाचलमध्ये ढगफुटी; दोघींचा मृत्यू; दुकाने वाहून गेली, गाड्या पाण्यात

सिमला : हिमाचल प्रदेशच्या काही भागात गेल्या चोवीस तासांत पावसाने हाहा:कार माजविला कुलू जिल्ह्यातील अणी आणि निरमंड येथे ढगफूटी झाल्याने दोन्ही भागांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. पावसामुळे भूस्खलन झाल्याने घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत ज्येष्ठ महिला आणि मुलीचा मृत्यू झाला. बियास नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने पंडोह धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहे. तसेच पंडोह धरणावरची वीजनिर्मिती थांबविण्यात आली आहे. कुलूच्या अणी आणि देवठी पंचायत हद्दीत गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास ढगफूटी झाल्याने पूर आला. पावसामुळे डोंगरावरची माती वाहून आल्याने आणि मातीचा ढिगारा एका घरावर पडल्याने ६० वर्षाची महिला आणि १६ वर्षाच्या मुलीचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. बागीपूल येथे स्वाह आणि चनाड गाड येथे ढगफूटी झाल्याने पूर आला.

परिणामी अणी आणि निरमंडचा कुलू जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला. लाहोल स्पिटी, मंडी, सिमला जिल्ह्यातील रामपूर आणि चंबा जिल्ह्यातही ढगफूटी झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. कुलू जिल्ह्यातील देवठी येथे ढगफूटी झाल्याने अणी बाजारात पळापळ झाली. भाजीपाला बाजारातील दहा दुकाने वाहून गेली. दुसरीकडे सिमला जिल्ह्यतील रामपूर आणि नेरवात देखील प्रचंड नुकसान झाले आहे. रामपूरच्या इंदिरा बाजारात डझनभर गाड्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या. तसेच नेरवा नाल्यात चारचाकी गाड्या वाहून गेल्या. यात एक पिकअप व्हॅन आणि तीन मोटारींचा समावेश आहे. गेल्या चोवीस तासात तीसपेक्षा अधिक गाड्यांचे आणि डझनभर घरांचे नुकसान झाले आहे.

बियास नदीकाठावर दक्षतेचा इशारा

भाक्रा-बियास मॅनेजमेंट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, कुलू मनालीच्या वरच्या भागात मुसळधार पाऊस होत असल्याने बियास नदी दुथडी भरून वाहत आहे. आज दुपारी बियास नदीवर असलेल्या पंडोह धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहे. बियास नदीत जितक्या वेगाने पाणी येत आहे, तितक्याच वेगाने धरणातून पाणी सोडले जात आहे. धरणातून विसर्ग होत असल्याने मंडी जिल्हा प्रशासनाला सजगतेचा इशारा दिला आहे. बियास नदी काठावर राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले.

१७० रस्तेमार्ग बंद

राज्यात पाच राष्ट्रीय महामार्गासह १७० रस्ते आणि ८७० वीज ट्रान्सफॉर्मर बंद पडले आहेत. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. मंडी येथे ८२, चंबा येथे ३१, कुल्लू येथे २८ आणि सिरमौर येथे १९ रस्ते बंद झाले आहेत. तसेच मंडी येथे ४०२ आणि सिरमौर येथे ३६७ ट्रान्सफॉर्मर बंद पडल्याने वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे.

जम्मू येथे दोन महिला पुरात बुडाल्या

जम्मू : जम्मूमधील रामबन जिल्ह्यात गुरुवारी मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामध्ये दोन महिला वाहून गेल्या. शमीमा बेगम आणि त्यांची कन्या रोझिया बेगम अशी त्यांची नावे असून, जम्मू काश्मीर पोलिस आणि लष्कराच्या जवानांनी त्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.

Web Title: Cloudburst In Himachal Heavy Rain Two Died Shops Were Washed Away Damage Vehicle

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..