
दादागिरी कराल तर ठेचून टाकू! शी जिनपिंग यांचा जगाला इशारा
बीजिंग : ‘आम्ही कोणत्याही परकीय शक्तीच्या दबावाखाली, वर्चस्वाखाली तसेच प्रभावाखाली येणार नाही. आमच्या स्वायत्ततेचे संरक्षण करण्यास आमचे लष्कर सामर्थ्यशाली आहे,’ असे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज ठामपणे सांगितले. चीनमधील सर्वशक्तीमान कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (सीपीसी) या पक्षाच्या स्थापने शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिनपिंग यांनी चिनी नागरिकांशी संवाद साधला.
हेही वाचा: एअरफोर्स स्टेशनवरील हल्ल्यात 'लष्कर'चा हात; आढळला 'हा' पुरावा
‘सीपीसी’च्या शताब्दी सोहळ्यानिमित्त बीजिंगमधील प्रसिद्ध तिआनमेन चौकात मुख्य कार्यक्रम झाला. हजारो पक्ष कार्यकर्ते आणि शाळकरी मुलांनी पक्षाची आणि देशाची गौरवगीते गायली. पक्षाचे संस्थापक माओ झेडाँग यांच्याप्रमाणेच देशावर संपूर्ण वर्चस्व मिळविलेले विद्यमान अध्यक्ष शी जिनपिंग हे कार्यक्रमाला ‘माओ-सूट’ परिधान करूनच दाखल झाले होते. तिआनमेन गेटच्या बाल्कनीतून भाषण करताना जिनपिंग यांनी चीनच्या सामर्थ्याचे कौतुक करतानाच इतर देशांना इशारा दिला. ‘चिनी लोक कधीही परकीय शक्तींना स्वत:वर वर्चस्व गाजवू देणार नाहीत की ते कोणाच्या दबावाखालीही येणार नाहीत. जो कोणी असा प्रयत्न करेल, ते १.४ अब्ज चिनी नागरिकांच्या पोलादी भिंतीवर आदळतील. आम्ही याआधीही कधीही दडपशाही सहन केली नव्हती, यापुढेही करणार नाही,’ असे जिनपिंग म्हणाले. जवळपास तासभर त्यांचे भाषण चालले. या कार्यक्रमाला देशाचे माजी अध्यक्ष हु जिंताओ आणि माजी पंतप्रधान वेन जिआबाओ हेदेखील उपस्थित होते.

हेही वाचा: देहू : संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान
जिनपिंग यांनी संस्थापक माओ यांच्यासह आधीच्या सर्व अध्यक्षांची नावे घेत पक्षाच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. जिनपिंग यांच्या भाषणाचे आणि उर्वरित कार्यक्रमाचेही थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.
तैवानला विलीन करणारच
सध्या स्वयंप्रशासन असलेल्या तैवानला सामावून घेण्याच्या चीनच्या दुर्दम्य इच्छेला कोणीही कमी समजू नये, असा इशाराही जिनपिंग यांनी दिला. ‘तैवानचे विलीनीकरण ही एक ऐतिहासीक मोहिम आहे. ही मोहिम पूर्ण करण्यासाठी चीनकडे प्रचंड इच्छाशक्ती, महत्त्वाकांक्षा आणि पूर्ण क्षमता आहे,’ असे ते म्हणाले.
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये
- ७१ लढाऊ विमानांची प्रात्यक्षिके
- तिन्ही सैन्य दलांचे छोटेखानी संचलन
- कार्यक्रमाला जवळपास ७० हजार पक्ष कार्यकर्ते आणि विद्यार्थी उपस्थित
- पक्षाचे अनेक माजी वरीष्ठ नेते उपस्थित
काय म्हणाले जिनपिंग...
- मार्क्सवादाचाच अवलंब करणार
- लष्कराच्या आधुनिकीकरणाला वेग आणणार
- चिनी नागरिकांमध्ये फुट पाडणे अशक्य
- ‘सीपीसी’ला बाधा आणणारा ‘विषाणू’ समूळ नष्ट करू
- भ्रष्टाचाराला कायमच विरोध
- ‘सीपीसी’चे सामर्थ्य वाढविण्यातच देशाचे हित
- आपले खरे करणाऱ्यांचे निर्बंध आम्हाला अमान्य
Web Title: Communist Party Marks Centenary Xi Jinping Vows China Will Never Be
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..