कोरोनामुळे कोरियात आणीबाणी; अध्यक्ष किम जोंग उन यांची घोषणा; पहिल्या रुग्णाची कबुली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kim Jong Un
कोरोनामुळे कोरियात आणीबाणी; अध्यक्ष किम जोंग उन यांची घोषणा; पहिल्या रुग्णाची कबुली

कोरोनामुळे कोरियात आणीबाणी; अध्यक्ष किम जोंग उन यांची घोषणा; पहिल्या रुग्णाची कबुली

सोल : उत्तर कोरियात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याची कबुली सरकारने दिली आहे. या विषाणूचे उच्चाटन करण्यासाठी अध्यक्ष किम जोंग उन यांनू देशभरात आणीबाणी जाहीर केला आहे, अशी माहिती सरकारी वृत्तसंस्थेने गुरुवारी दिली. त्याला ‘गंभीर राष्ट्रीय आणीबाणी’ असे नाव देण्यात आले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आतापर्यंत उत्तर कोरियात कोरोनाचा संसर्ग झाल्याचे कधीही मान्य करण्यात आले नव्हते. पण आता सरकारने देशात कोरोना पहिला रुग्ण आढळल्याची कबुली दिली असून कठोर निर्बंधही घातले आहेत.

कोरोनाची साथ २०२०पासून सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच देशाच्या सीमांवर नाकेबंदी करण्यात आली आहे. ‘कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सी’ने (केसीएनए) दिलेल्या माहितीनुसार प्याँगयाँगमध्ये आढळलेल्या रुग्ण तापाने आजारी होता. वैद्यकीय तपासणीत त्याला कोरोनाच्या ओमिक्रॉन बीए.२ या विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. उत्तर कोरियात याआधीही अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता, असा दावा काही वृत्तांमधून करण्यात आला.

किम जोंग यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत कोरोनाचे संकट रोखण्यासाठी आणीबाणीची घोषणा करण्यात आली. विषाणू नियंत्रणासाठी कठोर आणीबाणी’ लागू करणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. कमीत कमी कालावधीत कोरोनाचे मूळ नष्ट करणे हे ध्येय असल्याचे किम यांनी म्हटल्याचे वृत्त ‘केसीएनए’ने दिले आहे.

तज्ज्ञांच्या दाव्यानुसार

  • उ. कोरियातील दोन कोटी २५ लाख नागरिक लशीपासून वंचित

  • ‘डब्लूएचओ’, चीन, रशियाचा लसीकरणाचा प्रस्ताव धुडकावला होता

  • ढासळती व्यवस्था साथीचा सामना करण्यास असमर्थ

  • कोरोनाचा प्रादुर्भाव झालेले आणि ओमिक्रॉनचे संकटाशी लढत असलेल्या देशांच्या सीमेवर कोरियाचे स्थान

उत्तर कोरियातील स्थिती

  • सर्व शहरे व गावांमध्ये नागरिकांनी त्यांच्या परिसरात प्रवेशबंदी करण्याचे किम यांचे आवाहन

  • राजधानी प्याँगयाँगमध्ये दोन दिवस लॉकडाउन

  • साथीचा प्रसार रोखण्यासाठी उद्योग व उत्पादकांनी त्यांचे काम स्वतंत्रपणे राहील अशी व्यवस्था करावी

  • लॉकडाउनच्या भीतीने अनेक ठिकाणी खरेदीसाठी गर्दी