esakal | ब्रिटनमध्ये कोरोनाने डोके वर काढले; चोवीस तासात सात हजाराहून अधिक रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Covid Test

ब्रिटनमध्ये कोरोनाने डोके वर काढले; चोवीस तासात सात हजाराहून अधिक रुग्ण

sakal_logo
By
पीटीआय

लंडन - ब्रिटनमध्ये (Britain) ‘अनलॉक‘ला २३ दिवस पूर्ण झालेले असताना आणि सर्व व्यवहार सुरळीत करण्याची तयारी सुरू असताना कोरोनाबाधितांची (Corona Patient) संख्या वाढू लागली आहे. परिणामी ब्रिटनचे आरोग्य तज्ञ पुन्हा पेचात पडले असून तिसऱ्या लाटेबाबत सांशकता व्यक्त केली जात आहे. (Corona Increase in Britain)

लंडनसह देशात बुधवारी चोवीस तासात ७५४० नवीन रुग्ण आढळले. एवढ्या प्रमाणात रुग्ण आढळण्याची १०३ दिवसानंतर पहिलीच वेळ आहे. यापूर्वी २६ फेब्रुवारी रोजी ७४०१ रुग्ण आढळले होते. त्यामुळे ब्रिटनमध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. २१ जूनपर्यंत अशीच स्थिती राहिली तर लॉकडाउनचे निर्बंध पुन्हा लागू होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. देशभरात एक आठवड्यापासून सलग ५५०० पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. गेल्यावर्षीच्या ख्रिसमसनंतर प्रथमच सध्या एवढ्या मोठ्या संख्येने सलग रुग्ण वाढत असून ते प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. आगामी दोन-तीन आठवड्यात आणखी नवीन रुग्ण आढळून शकतात, असा तज्ञांचा अंदाज आहे. दुसरीकडे रुग्ण जरी वाढत असले तरी ब्रिटनला धोका नसल्याचे काहींचे म्हणणे आहे. संपूर्ण देशात कोरोनामुळे काल सहा जणांचा मृत्यू झाला तर २२३४ जण बरे झाले.

हेही वाचा: मलाला युसुफझाईला मौलवीकडून धमकी; विवाहाबाबतच्या विधानावर पडसाद

मलेशियात लसीकरण मोहीम

क्वालालंपूर : मलेशियात आतापर्यंत ३.७ टक्के म्हणजेच ११.८ लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. कोरोनावर अंकुश ठेवण्यासाठी मलेशियाने कोरोनाला १०० दिवसात संपूर्ण लोकसंख्येला म्हणजेच ३.२० कोटी लोकांना लस देण्याचे ध्येय ठेवले आहे. देशात लसीकरणाची सरासरी १.१० लाख प्रतिदिन राहिली आहे.

ऑस्ट्रेलियात अनलॉक

ऑस्ट्रेलियात कोरोनामुळे लागू केलेले निर्बंध आणि लॉकडाउन उद्या (ता.११) पासून मागे घेण्यात येणार आहेत. त्याचवेळी अमेरिकेने जपानच्या प्रवासाला मुभा दिली आहे. परंतु जपानला जाण्यापूर्वी पुनर्विचार करावा, असे आवाहन केले आहे. तसेच चीनच्या ग्वांझसू प्रांतात कोरोनामुळे सिनेमा, थिएटर आणि नाइट क्लब बंद करण्यात आले आहेत.

इंडोनेशिया, रशियातही रुग्ण आढळले

जाकार्ता/मॉस्को: इंडोनेशियात शंभर दिवसांनंतर सर्वाधिक ७७२५ रुग्ण आढळले आहेत. तसेच काल चोवीस तासात १७५ जणांचा मृत्यू झाला आहे. रशियातही चोवीस तासात १०,४०७ रुग्ण आढळले आहेत. ही संख्या मार्च महिन्यानंतर सर्वाधिक मानली जात आहे. कोरोनापासून स्वत:चा बचाव करणाऱ्या तैवानमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तैवानमध्ये २४ तासात २७५ रुग्ण आढळले तर २५ जणांचा मृत्यू झाला आहे. तैवानमधील मृतांची संख्या आतापर्यंतची सर्वाधिक मानली जात आहे.