‘कोरोना’मुळे चीनमधील प्रदूषण घटले

पीटीआय
मंगळवार, 3 मार्च 2020

चीनवरील अवकाशातील प्रदूषणाच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे अमेरिकेच्या राष्ट्रीय अवकाश संशोधन संस्था (नासा) आणि युरोपियन अवकाश संस्थेला (ईएसए) आढळून आले आहे. या संस्थांनी टिपलेल्या उपग्रह छायाचित्रांमधून ही बाब समोर आली आहे. 

वॉशिंग्टन - ‘कोरोना’मुळे चीनमध्ये मोठ्या संख्येने बळी गेले असले तरी त्या देशासाठी हे संकट काही बाबतीत लाभदायी ठरताना दिसते आहे. चीनवरील अवकाशातील प्रदूषणाच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे अमेरिकेच्या राष्ट्रीय अवकाश संशोधन संस्था (नासा) आणि युरोपियन अवकाश संस्थेला (ईएसए) आढळून आले आहे. या संस्थांनी टिपलेल्या उपग्रह छायाचित्रांमधून ही बाब समोर आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे आर्थिक मंदीसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे प्रदूषणाच्या प्रमाणात मोठी घट झाल्याचे ‘नासा’ने म्हटले आहे. ‘नासा’च्या निवेदनानसुार, चीनमधील वातावरणात नायट्रोजन डाय-ऑक्साईड (एनओ-२) या विषारी वायूच्या प्रमाणात मोठी घट झाल्याचे दिसते आहे. वाहने, ऊर्जा प्रकल्प आणि औद्योगिक कारखान्यांमधून या विषारी वायूचे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन केले जाते. पृथ्वीवरील वातावरणातील प्रदूषणाच्या पातळीवर लक्ष ठेवणाऱ्या उपग्रहांनी टिपलेल्या छायाचित्रांमधून ही माहिती समोर आली आहे.

वाहतूक, कारखाने बंद
कोरोनाच्या उद्रेकानंतर चीनने जानेवारीपासून वुहान शहराकडे जाणारी आणि तेथून येणारी वाहनसेवा बंद केली आहे. वुहानमधील व्यापारी संस्था, उद्योगांचे कामकाजही थांबविण्यात आले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चीनकडून ही पावले उचलण्यात आली आहेत.   

मोठ्या भूभागावरील वातावरणातील प्रदूषणात मोठी घट झाल्याचे दिसून आले असून, अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. ‘एनओ-२’चे प्रमाण वुहानजवळ पहिल्यांदा कमी झाले, त्यानंतर चीनमधील इतर ठिकाणीही अशीच परिस्थिती दिसून आली. २००८मधील औद्योगिक मंदीच्या काळातही एनओ-२च्या प्रमाणात घट झाली होती, तरी ते प्रमाण अल्प होते. 
- फेई लियू, ‘नासा’चे संशोधक

दोन उपग्रहांचा वापर
चीनमधील काही शहरांच्या सीमा सील करण्यापूर्वी (१ ते २० जानेवारी) आणि सीमा सील केल्यानंतरची (१० ते २५ जानेवारी) प्रदूषणाची परिस्थिती दाखविणारे नकाशे तयार केले गेले आहेत. ईएसएच्या ‘सेंटिनेल- ५’ या उपग्रहावरील ट्रोपोस्फेरिक मॉनिटरिंग इंस्ट्रूमेंट या उपकरणाने पाठविलेल्या आणि  नासाच्या ‘अॅरा’ उपग्रहावरील ओझोन मॉनिटरिंग इंस्ट्रूमेंटने जमा केलेल्या माहितीचाही वापर यासाठी करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona reduces pollution in China