esakal | लस आली तरी कोरोना पाठ सोडणार नाही; संयुक्त राष्ट्राचा अहवाल
sakal

बोलून बातमी शोधा

covid vaccine pandemic

जगभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवातही झाली असली तरी अद्याप रुग्णांची संख्या आणि प्रादुर्भाव कमी होत नाहीय. अनेक देशांमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेचाही तडाखा बसला आहे.

लस आली तरी कोरोना पाठ सोडणार नाही; संयुक्त राष्ट्राचा अहवाल

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जिनिव्हा - चीनमध्ये पहिल्यांदा कोरोनाचा रुग्ण सापडल्याच्या घटनेला दीड वर्षाहून अधिक काळ झाला. जगभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवातही झाली असली तरी अद्याप रुग्णांची संख्या आणि प्रादुर्भाव कमी होत नाहीय. अनेक देशांमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेचाही तडाखा बसला आहे. इतकं असूनही कोरोना कुठून आणि कसा आला याची माहिती समोर आलेली नाही. गेल्या वर्षभरापासून कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, यातच आता संयुक्त राष्ट्र संघाच्या एका अहवालातून धक्कादायक असा खुलासा झाला आहे. या अहवालानुसार जर कोरोना बराच काळ राहिला तर तो आणखी धोकादायक बनू शकतो.  कोरोनामुळे आतापर्यंत जगात 27 लाख जणांचा मृत्यू झाला आहे. 

तर कोरोना लवकर पाठ सोडणार नाही
तज्ञांच्या एका गटाने कोरोनाच्या प्रसारासंदर्भात माहिती गोळा करण्यासाठी हवामान शास्त्र आणि हवेतील गुणवत्तेचे अध्ययन केले. यात कोविड-१९ आता मोसमी आजाराप्रमाणे आगामी काही काळ त्रास देऊ शकतो, असे म्हटले आहे. जागतिक हवामान संघटनेने नेमलेल्या १६ सदस्यीय टीमने म्हटले की, श्‍वासासंबंधीचा संसर्ग हा प्रामुख्याने मोसमी असतो. हवामान बदलताच हा संसर्ग वाढतो. कोरोनाने देखील हवामान आणि वातावरणानुसार आपला प्रभाव दाखवला. जर पुढील अनेक वर्ष हा असाच त्रास देत राहिला तर तो एक गंभीर आजार म्हणून समोर येईल. संशोधकांच्या टीमने इशारा दिला आहे की, हवामान बदलानुसार होणाऱ्या साथीला रोखण्यासाठी घालण्यात आलेले निर्बंध शिथिल करून चालणार नाही. जर हा आजार बराच काळ राहिला तर पुढच्या काही वर्षांमध्ये मोसमी आजार होईल. असे झाले तर कोरोना लवकर पाठ सोडणार नाही. 

हे वाचा - भारतात दुसरी लाट नको रे बाबा! अमेरिका-युरोपमधील 2 ऱ्या लाटेचा कहर वाईट

गंभीर मोसमी आजार बनण्याचा धोका
संयुक्त राष्टराच्या संशोधकांच्या पथकाने सांगितलं की, श्वासासंबंधी असलेले संसर्गजन्य आजार हे मोसमी असतात. कोरोना व्हायरस सुद्धा हवामान आणि तापमानानुसार त्याचा प्रभाव दाखवेल. आतापर्यंत कोरोनाला रोखण्यासाठी जितके प्रयत्न केले गेले ते कुचकामी ठरत असल्याचं दिसत आहे. जर पुढच्या काही वर्षांमध्ये असेच चित्र राहिले तर कोरोना एक गंभीर स्वरुपाचा मोसमी आजार बनेल अशी भीतीही व्यक्त करण्यात आली. 

निर्बंध शिथिल करता येणार नाहीत
संशोधकांनी सांगितलं की, आतापर्यंत संसर्गाचा वेग हा हवामान बदलापेक्षा सरकारने वेळोवेळी उचललेल्या पावलांमुळे कमी अधिक राहिला आहे. यामध्ये मास्क बंधनकारक करणं, प्रवासावर निर्बंध इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. यामुळेच हवामान बदलावर अवलंबून राहू नये असा सल्ला दिला जात आहे. संशोधकांच्या पथकातील अमेरिकेतील बेन जेचिक यांनी सांगितलं की, असे कोणतेच पुरावे नाहीत जे सरकारला हवामानाच्या आधारावर निर्बंध शिथिल करण्यासाठी परवानगी देऊ शकतील. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात काही ठिकाणी उन्हाळ्यात रुग्णांची संख्या प्रचंड वाढली होती. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

हवेच्या गुणवत्तेचा परिणाम
कोरोनाच्या संसर्गाबाबत संशोधन करताना ऋतू आणि हवेच्या गुणवत्तेचा आधार घेतला. अहवालामध्ये असं सांगण्यात आलं आहे की, अभ्यासातून असं समोर आलंय की कोरोना व्हायरस थंडीत, उन्हाळ्यात आणि जिथं अतिनील किरणं कमी असतात अशा ठिकाणी जास्त काळ टिकतो. मात्र अद्याप हे स्पष्ट झालेलं नाही की, हवामानासंबंधित निकषांचा विषाणूंच्या संसर्गावर किती परिणाम होतो. पण असे काही पुरावे मिळाले आहेत जे हवेच्या कमी गुणवत्तेमुळे संसर्गाचा धोका वाढवू शकतात. 

loading image
go to top