esakal | लसीच्या भरवशावर राहू नका, संसर्ग संपण्यास खूप वेळ; WHO प्रमुखांचा इशारा

बोलून बातमी शोधा

who chief Tedros Adhanom Ghebreyesus
लसीच्या भरवशावर राहू नका, संसर्ग संपण्यास खूप वेळ; WHO प्रमुखांचा इशारा
sakal_logo
By
कार्तिक पुजारी

जिनीव्हा- जगभरात आतापर्यंत नागरिकांना लशींचे ७८ कोटींहून अधिक डोस दिले गेले असले तरी कोरोना संसर्ग संपण्यासाठी बराच काळ वाट पहावी लागणार असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रॉस अधनोम घेब्रेयेसूस यांनी दिला आहे. अर्थात, सार्वजनिक ठिकाणी आरोग्य नियमांचे काटेकोर पालन करून हा संसर्ग नियंत्रणात आणता येईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. पत्रकारांशी संवाद साधताना घेब्रेयेसूस म्हणाले की, या वर्षाच्या सुरुवातीला जगभरातील बहुतेक देशांमध्ये सलग सहा आठवडे कोरोना संसर्गाचे रुग्ण कमी झाल्याचे दिसून आले. मात्र, नंतरचे सलग सात आठवडे रुग्णसंख्या वाढते आहे. गेल्या चार आठवड्यांपासून मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. आशिया आणि आखाती देशांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे ७८ कोटींहून अधिक लशींचा वापर केला गेला असला तरी संसर्ग लवकरच संपण्याची चिन्हे नाहीत. लस हे संसर्ग रोखण्याचे उपयुक्त साधन असले तरी ते एकमेव साधन नाही. त्यामुळे सामाजिक अंतर पाळणे, मास्क लावणे, हात वारंवार धुणे हा मूलभूत सवयी लावून घेणे अत्यावश्‍यक आहे. सार्वजनिक ठिकाणी आरोग्य सुरक्षेचे नियम पाळल्यास संसर्गावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविणे शक्य आहे, असेही घेब्रेयेसूस म्हणाले

जगभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाची तिसरी किंवा चौथी लाट आली आहे. अमेरिका कोरोना महामारीने सर्वाधिक प्रभावित असलेला देश ठरला आहे. दुसरीकडे भारत ब्राझीलला मागे टाकत दुसऱ्या स्थानी आला आहे. भारतात गेल्या २४ तासात सुमारे १ लाख ६१ हजार ७३६ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी ३६ लाख ८९ हजार ४५३ झाली आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा दुसरी लाट आली आहे. पंजाब, महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांचा विस्फोट झाला आहे. महाराष्ट्रामध्ये परिस्थिती गंभीर बनली असून राज्यात लॉकडाऊन केले जाण्याची शक्यता आहे.