चिंताजनक : उन्हाळ्यातही कोरोना व्हायरस कमी होणार नाही! 

टीम ई-सकाळ
Saturday, 7 March 2020

चीनमध्ये कोरोनाव्हायरसचा धोका कमी होत असल्याचे सांगितले जात असले तरी, आणखी २८ जणांचा मृत्यू झाल्याने देशातील बळींची संख्या ३ हजार ७० वर गेली आहे, अशी माहिती चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली

जिनिव्हा Coronavirus : कोरोनाव्हायरचा प्रादुर्भाव उन्हाळ्यात कमी होईल, अशी कोणतीही चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत, असा खुलासा जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी संचालक मायकेल रेयान यांनी केला. विविध प्रकारच्या तापमानात हा विषाणू तग धरतो किंवा नाही, त्याचा हालचाल कशी असते, हे अद्याप आपल्याला समजलेले नाही. त्यामुळे एन्फ्ल्यूएन्झा (शीतज्वर) सारखा हा आजार उन्हाळ्याच्या काळात नाहीसा होईल, या समजाला कोणतेही ठोस पुरावे मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. हा आजार पृथ्वीवर कोठेही पसरू शकत असल्याने कोणत्याही संस्कृतीला दोष देण्याऐवजी जीव वाचविण्यासाठी आवश्‍यक ते सर्व उपाय करण्याकडे लक्ष देण्याचे आवाहन रेयान यांनी देशांना व समाजाला केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जगभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चीनमध्ये हाहाकार
चीनमध्ये कोरोनाव्हायरसचा धोका कमी होत असल्याचे सांगितले जात असले तरी, आणखी २८ जणांचा मृत्यू झाल्याने देशातील बळींची संख्या ३ हजार ७० वर गेली आहे, अशी माहिती चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या डिसेंबरमध्ये या विषाणूचा प्रसार प्रथम चीनमध्ये झाला. आता तो ९७ देशांमध्ये पसरला असून, एक लाख दोन हजार १८० जणांना याची लागण झाली आहे. यात चीनमधील ८० हजार ६५१ रुग्णांचा समावेश आहे, असे कोरोनाव्हायरसचा आढावा घेणारे जॉन हॉपकिन्स यांनी सांगितले. कोरोनाबाधित ९९ नवे रुग्ण आढळले असल्याची नोंद चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने आज केली. देशात काल ज्या २८ जणांचा मृत्यू झाला ते सर्वजण कोरोनाग्रस्त हुबेई प्रांत आणि त्याची राजधानी वुहानमधील आहेत. 

जगभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जगात कोठे काय घडले?

  • आंतरराष्ट्रीय पर्यटकांमध्ये यंदा १.०ते ३.० टक्क्यांनी घट होण्याचा जागतिक पर्यटन संघटनेचा अंदाज 
  • ब्रिटनमध्ये प्रसार रोखण्यासाठी संसद पाच महिन्यांसाठी स्थगित 
  • इराणमधील कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार फतेमह रहबार (वय ५५) यांचा कोरोनामुळे मृत्यू 
  • इराणमध्ये आत्तापर्यंत सात राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. 
  • मागणीअभावी तेलाच्या किंमतीत ७.५ टक्क्यांची घट 
  • कॅलिफोर्नियातील समुद्र किनाऱ्यावरील जहाजातील १९ कर्मचाऱ्यांसह २१ जणांना लागण 
  • प्लोरिडात दोन जणांचा मृत्यू 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus summer impact who explains china condition updates