Corona Vaccine - रशियाची Sputnik V लस 95 टक्के प्रभावी; संशोधकांनी दिली माहिती

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 November 2020

जगात सर्वात आधी लस तयार झाल्याची घोषणा रशियाने केली होती. मात्र ट्रायलचा डेटा दिला नसल्याने स्पुतनिकबाबत शंका व्यक्त केला जात होती.

मॉस्को - कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या लशींमध्ये आता रशियाच्या स्पुतनिकचासुद्धा नंबर लागला आहे. याआधी फायझर, मॉडर्ना, कोविशिल्ड व्हॅक्सिन कोरोनाच्या उपचारात 90 ते 95 टक्के प्रभावी ठरल्याचं समोर आलं होतं. आता रशियाच्या स्पुतनिक V व्हॅक्सिनच्या क्लिनिकल ट्रायलच्या विश्लेषणातून लस 95 टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याची माहिती देण्यात आली आहे. मंगळवारी लस तयार करणाऱ्या कंपनीने याबाबत माहिती दिली. 

रशियाची सरकारी संशोधन संस्था Gamaleya research centre आणि Russian Direct Investment Fund (RDIF) या संस्था मिळून लस तयार करत आहेत. दोन्ही संस्थांसह रशियन आरोग्य मंत्रालयाकडून मंगळवारी एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले. यामध्ये सांगण्यात आलं आहे की, 42 दिवसांपूर्वी देण्यात आलेल्या डोसनंतर एकत्र करण्यात आलेल्या डेटाच्या आधारे ही माहिती देण्यात आली आहे. 

स्पुतनिक 5 च्या लशीबाबत आणखी एक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे याच्या एका डोसची किंमत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये 10 डॉलर्सपेक्षा कमी असेल. तर रशियाच्या नागरिकांसाठी ही मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. एका व्यक्तीला दोन डोसची गरज असेल. 

हे वाचा - Coronavirus : चीनमध्ये कोरोना चाचण्यांना वेग

रशियाची व्हॅक्सिनची पहिली आंतरराष्ट्रीय डिलिव्हरी जानेवारी 2021 मध्ये होईल. यामध्ये परदेशी निर्मिती कंपन्यांसोबत कराराच्या आधारावर ग्राहकांना व्हॅक्सिन उपलब्ध करून देण्यात य़ेईल. तर क्लिनिकल ट्रायलच्या दुसऱ्या विश्लेषणानुसार पहिला डोस दिल्यानंतर 28 दिवसानंतर स्पुतनिक V लस 91 टक्क्यांहून अधिक प्रभावी ठरली आहे.  जगात सर्वात आधी लस तयार झाल्याची घोषणा रशियाने केली होती. मात्र ट्रायलचा डेटा दिला नसल्याने स्पुतनिकबाबत शंका व्यक्त केला जात होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 russian vaccine sputnik v 95 percent effective says researchers