दुसऱ्यांदा कोरोना झाल्यास शरीरावर काय होतो परिणाम? संशोधकाच्या दाव्यामुळे चिंता वाढली

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 13 October 2020

एकदा कोरोना झाल्यास भविष्यासाठी शरीरात इम्युनिटी तयार होते, याची शाश्वती देता येत नाही, असं रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलं आहे.

वॉशिंग्टन- कोरोना विषाणूची बाधा दुसऱ्यांदा झाल्यास शरीरात अधिक गंभीर दुष्परिणाम दिसू शकतात. शिवाय एकापेक्षा अधिकवेळा कोविड विषाणूची लागण होऊ शकते, असा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे. The Lancet Infectious Diseases journal charts मध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. एकदा कोरोना झाल्यास भविष्यासाठी शरीरात इम्युनिटी तयार होते, याची शाश्वती देता येत नाही, असं रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलं आहे.

अमेरिकेतील एका 25 वर्षीय तरुणाला 48 दिवसांत दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली. दुसऱ्यावेळी त्याच्यात अधिक गंभीर दुष्परिणाम दिसून आले. शिवाय तरुणाला ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते, असं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. बेल्जियम, नेदरलँड, हाँगकाँग आणि इक्वेडोरमधील रुग्णांच्या प्रकरणातही असेच निकाल आल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. कोरोना लशीच्या शोधावर या नव्या संशोधनामुळे प्रभाव पडेल, असं वैद्यकीय संशोधक हॉली ग्रेल यांचे म्हणणे आहे. 

Hathras: दिल्ली किंवा मुंबईत सुनावणी करण्याची पीडितेच्या कुटुंबीयांची मागणी

कोरोनाची लागण पुन्हा होण्यामुळे या विषाणूविरोधात निर्माण झालेल्या इम्युनिटीबाबतची आपली समजूत बदलू शकते. विशेष करुन कोरोनाची प्रभावी लस उपलब्ध नाही. त्यामुळे याच्या अभ्यासाला महत्व आहे, असं नवाडा पब्लिक हेल्थ लॅबॉरेटरीचे वैज्ञानिक मार्क पंडोरी म्हणाले आहेत. शरीरात इम्युनिटी किती काळापर्यंत टिकून राहते, याबाबत आपल्याला अधिक संशोधन करण्याची गरज आहे. तसेच दुसऱ्यांदा कोरोनाची लागण होणे दुर्मिळ आहे का? हेही पाहावं लागेल, असं ते म्हणाले आहेत. 

लस आपल्या शरीरातील नैसर्गिक इम्युन प्रतिसाद एका मर्यादेपर्यंत वाढवते. त्यामुळे अँटिबॉडी भविष्यातील विषाणूचा सामना करण्यासाठी सक्षम होतात. पण, कोरोना अँटिबॉडी शरीरात किती काळापर्यंत टिकतात हे स्पष्ट नाही. दुसरीकडे, कांजण्या एकदा झाल्यास त्या पुन्हा होत नाही, कारण या आजाराची रोगप्रतिकारशक्ती शरीरात कायमची तयार होते.

दरम्यान, काही संधोधकांच्या म्हणण्यानुसार दुसऱ्यांदा संसर्ग होणे, दुर्मिळ असते. कारण लाखो रुग्णांपैकी काहींनाच पुन्हा लागण झाल्याचे समोर आले आहे. शिवाय दुसऱ्यांदा विषाणूची लागण होत असल्यास वैज्ञानिकांना कोविड लशीच्या प्रभावीपणाबाबत पुन्हा विचार करावा लागणार आहे. 

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid patients may experience more severe symptoms the second time they are infected