आंनदाची बातमी! कोविड लस एका महिन्यात येणार; ट्रम्प यांनी केलं जाहीर

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 16 September 2020

कोरोना महामारी झपाट्याने पसरत असताना विषाणूवर प्रभावी ठरणारी लस केव्हा येईल, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

वॉशिंग्टन- कोरोना महामारी झपाट्याने पसरत असताना विषाणूवर प्रभावी ठरणारी लस केव्हा येईल, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अशात अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी लशीबाबत मोठी घोषणा केली आहे. कोविड लस एका महिन्याच्या अवधित उपलब्ध होणार असल्याचं ते म्हणाले आहेत. पेनेसेल्वेनियामध्ये प्रश्नोत्तराच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. 

कोरोना लस निर्मितीचे काम अत्यंत गतीने पुढे जात आहे. आपण लस मिळण्याच्या अगदी जवळ आहोत. काही आठवण्यात म्हणजे तीन किंवा चार आठवड्यात आपल्याला विषाणूवर प्रभावी ठरणारी लस मिळेल, असं ट्रम्प म्हणाले आहेत. कोरोना लस कधी येईल हे सांगतानाच ट्रम्प यांनी ही महामारी आपोआप नष्ट होईल, अशी पुष्टीही जोडली आहे. 

नेपाळ हादरले; शास्त्रज्ज्ञ म्हणताहेत ही मोठ्या भूकंपाची चाहूल

कोरोना लस केव्हा येईल, याबाबत ट्रम्प वेगवेगळे दावे करताना दिसत आहेत. कारण दोन दिवसांपूर्वी त्यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत लस चार ते आठ आठवड्यात येईल, असं म्हटलं होतं.  कोविड लस लवकरात लवकर तयार व्हावी, यासाठी डोनाल्ड ट्रम्प शास्त्रज्ञांवर दबाव आणत असल्याचा आरोप डेमोक्रॅटिकने केला आहे. अमेरिकेत 3 नोब्हेंबर रोजी अध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या आधी कोरोना लस आणण्यासाठी ट्रम्प प्रयत्न करत आहेत. 

अमेरिकेत कोरोना महामारीने अक्षरश: थैमान घातले आहे. अमेरिकेत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 66 लाखांच्या पुढे गेलीये. आतापर्यंत विषाणूचा बळी ठरलेल्या रुग्णांची संख्या 2 लाखांजवळ जाऊन ठेपली आहे. कोरोना बळींची संख्या वाढत आहे. त्यातच अमेरिकेत वर्णभेदी आंदोलन पेटलं आहे. शिवाय आर्थिक पातळीवरही अमेरिकेची पिछाडी होताना दिसत आहे. त्यातच अध्यक्षपदाच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्याने ट्रम्प यांनी कोरोना लस लवकर निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळेच ते वैज्ञानिकांवर लस निर्मितीसाठी दबाव आणत असल्याचं सांगितलं जातंय.

देशातील या सहा कंपन्यांची विक्री होणार; अनुराग ठाकूर यांनी दिले संकेत

दरम्यान, जगभरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जगभरातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3 करोडपर्यंत जाऊन पोहोचला आहे. जगभरात आतापर्यंत 9 लाख 93 हजार लोकांचा कोरोनाने बळी घेतलाय. अमेरिका कोरोनाने सर्वाधिक प्रभावीत देश ठरला आहे. त्यापाठोपाठ भारताचा क्रमांक असून ब्राझीलचा तिसरा क्रमांक आहे. सध्या जगभरातील 100 पेक्षा अधिक उमेदवार कोरोनावर प्रभावी लस निर्माण करण्याच्या कामात गुंतले असल्याचं जागतिक आरोग्य संघटेनेने सांगितलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid vaccine coming in a month said donald Trump us election