'आम्ही दहशतवाद्यांना टिप देत नाही’

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 जुलै 2018

टेक्सासः मुस्लिम नाव असल्याने वेटरला टिप देण्यास ग्राहकाने नकार देत बिलावर 'आम्ही दहशतवाद्यांना टिप देत नाही', असा मजकूर लिहीला आहे. संबंधित वेटरने ते बिल सोशल मीडियावर व्हायरल केले असून, नेटिझन्सने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

टेक्सासः मुस्लिम नाव असल्याने वेटरला टिप देण्यास ग्राहकाने नकार देत बिलावर 'आम्ही दहशतवाद्यांना टिप देत नाही', असा मजकूर लिहीला आहे. संबंधित वेटरने ते बिल सोशल मीडियावर व्हायरल केले असून, नेटिझन्सने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

खलील केविल (वय 20) याने फेसबुकवरुन आपल्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार शेअर केला आहे. आपण एखाद्या विचारसरणीच्या किती आहारी जातो, याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे खलीलने म्हटले आहे. खलील म्हणाला, 'एक व्यक्ती हॉटेलमध्ये आली होती. त्याच्याकडे दिलेल्या बिलावर त्याने आम्ही दहशतवाद्यांना टीप देत नसल्याचे बिलावर लिहीले. बिलावरील मजकूर पाहून मी थक्कच झालो. एखाद्याची विचारसरणी किती खालच्या दर्जाची असू शकते, हे पहायला मिळाले.'

सोशल मीडियावर हे बिल मुद्दामहून अपलोड केले आहे. कारण हे जगासमोर यावे, हे वाटत होते. हे बिल अपलोड केल्यानंतर जवळपास 20 हजार लोकांनी लाईक केले असून, सहा हजारहून अधिक जणांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. शिवाय, 16 हजार शेअर झाले आहे, यावरूनच याची तीव्रता कळते, असेही खलीलने म्हटले आहे. सोशल मीडियावर समर्थन दिल्याबद्दल खलिलने सर्वांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, एका इन्स्टाग्राम युजरने घटनेचा निषेध करताना म्हटले आहे की, अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहणाऱ्या खलिलला एका ग्राहकाने दहशतवादी म्हटले आहे. आश्चर्य म्हणजे तो मुस्लिम नाही. त्याचे नाव फक्त मुस्लिम आहे. हा सरळ-सरळ वर्णभेद आहे. आपण कधी सुसंस्कृत होणार आहोत?.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: customer refuse tip and write we dont tip terrorist