अमेरिकेत पहिल्यांदाच दहीहंडीचा थरार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dahihandi Festival 2022 first time in America

Dahihandi Festival 2022 : अमेरिकेत पहिल्यांदाच दहीहंडीचा थरार!

अखंड महाराष्ट्रात गोविंदा थरावर थर रचून धुमाकूळ घालत असताना, तिकडे सातासमुद्रापार अमेरिकेतील Beats of Redmond च्या गोविंदांनी Seattle शहरातील मानाची हंडी फोडली. ही दहीहंडी खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरली कारण हा अमेरिकेच्या इतिहासातील पहिलाच दहीहंडी सोहळा होता. दहीहंडी च्या औचित्याने भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या ७५ वर्षांच्या उत्सवानिमित्त अमेरिकेच्या भूमीवर झेंडावंदन आणि राष्ट्रगीताचे गायन देखील करण्यात आले.

Beats of Redmond या अमेरिकेतील Seattle शहरातील सेवाभावी संस्थेने यंदा अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच दहीहंडीचा उपक्रम राबवण्याचा विडा उचलला आणि संस्थेच्या गोविंदांनी हे शिवधनुष्य लीलया पेलले. Beats of Redmond ची सुरवात श्री आनंद साने आणि सौ. दीपाली साने यांनी २०१९ साली वॉशिंग्टन राज्यातील सगळ्यात पहिल्या ढोल ताशा पथकाच्या माध्यमातून केली.

या संस्थेचा मूळ उद्देश आपल्या मायदेशापासून हजारो मैल लांब राहून सुद्धा महाराष्ट्राच्या समृद्ध अशा परंपरांचे जतन व प्रसार करणे आणि आपल्या पुढील पिढीला हा वारसा जपण्याची शिकवणूक देणे असा आहे. Beats of Redmond चे स्वयंसेवक अनेक नामांकित सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये उच्च पदांवर कार्यरत असून देखील वेळात वेळ काढून महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचे काम चोख पार पाडतात

दरवर्षी Beats of Redmond वॉशिंग्टन राज्यातील सर्वात मोठा सार्वजनिक गणेशोत्सव अगदी धुमधडाक्यात पार पाडते. त्यासोबतच दिवाळी, होळी, स्वातंत्र्य दिन, शिवजयंती आणि रामनवमी यासारख्या भारतीय सणांचे देखील ही संस्था यथोचित आयोजन करते. या सर्व सोहळ्यांसाठी ढोल ताशाच्या गजरासोबतच लेझीम, झांजा, लावणी आणि साहसी मर्दानी खेळांची मेजवानी अमेरिकास्थित भारतीयांना, भारतातील तिथल्या पुढल्या पिढीला आणि स्थानिक लोकांना अनुभवायला मिळते. आता संस्थेचे सर्व कार्यकर्ते जोमाने बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला लागले आहेत आणी सगळ्या अमेरिकेतील जनतेची ची उत्सुकता सुद्धा शिगेला पोचली आहे.