संरक्षण संबंधांना अधिक बळकटी

पीटीआय
बुधवार, 5 डिसेंबर 2018

वॉशिंग्टन : भारत आणि अमेरिकेदरम्यानचे संरक्षण आणि सुरक्षा संबंध अधिक दृढ करण्यास दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. भारत-प्रशांत भागात आणि जागतिक पातळीवरही भारत हा शक्तिशाली देश म्हणून मान्यता पावला असल्याचे कौतुकही अमेरिकेने केले. 

वॉशिंग्टन : भारत आणि अमेरिकेदरम्यानचे संरक्षण आणि सुरक्षा संबंध अधिक दृढ करण्यास दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. भारत-प्रशांत भागात आणि जागतिक पातळीवरही भारत हा शक्तिशाली देश म्हणून मान्यता पावला असल्याचे कौतुकही अमेरिकेने केले. 

संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज येथे अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांची भेट घेत चर्चा केली. या दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या वर्षभरात चौथ्यांदा चर्चा झाली आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच शब्दांत सांगायचे तर, भारत आणि अमेरिकेने इतिहासातील संकोचपूर्ण संबंधांना तिलांजली देत मैत्रीचे नवे पर्व सुरू केले आहे. व्यूहात्मक भागीदारी आणि व्यूहात्मक स्वायत्तता यांच्याबाबत कोणतेही मतभेद नसल्याचेही स्पष्ट झाले आहे,' असे मॅटिस या वेळी म्हणाले. दोन्ही देशांनी संरक्षण संबंधांत मोठी सुधारणा केली असून, भारताने "टू प्लस टू' चर्चेला सुरवात करून या संबंधांना वेग आणला असल्याचेही मॅटिस यांनी सांगितले. सीतारामन आणि मॅटिस यांच्यात आज झालेल्या चर्चेत "टू प्लस टू' चर्चेवेळी ठरलेल्या मुद्यांच्या अंमलबजावणीवर सकारात्मक चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्या वेळी झालेल्या "कॉमकासा' करारामुळे अमेरिकेकडून अत्याधुनिक लष्करी यंत्रणा मिळविण्याचा भारताचा मार्ग मोकळा झाला आहे. 

पदभार स्वीकारल्यानंतर संरक्षणमंत्री सीतारामन यांचा हा अमेरिका दौरा आहे. पुढील अनेक वर्षांच्या संबंधांसाठी भारत आणि अमेरिकेने पायाभरणी केली असून हे संबंध परस्पर विश्‍वासावर आधारलेले असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. पाच दिवसांच्या या दौऱ्यात त्या कॅलिफोर्नियामधील अमेरिकेच्या संरक्षण संशोधन केंद्राला आणि हवाईमधील भारत-प्रशांत विभागाच्या मुख्यालयाला भेट देतील. 

पाकने जबाबदारी उचलावी : मॅटिस 

भारताबरोबर संरक्षण संबंध वाढवितानाच अमेरिकेने पाकिस्तानला मात्र कडक इशारा दिला आहे. दक्षिण आशियामध्ये शांतता निर्माण करण्याच्या संयुक्त राष्ट्रसंघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांना "प्रत्येक जबाबदार देशाने' पाठिंबा देण्याची वेळ आली आहे, असे अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस आज म्हणाले.

अफगाणिस्तानमधील अंतर्गत संघर्ष संपविण्यासाठी पाकिस्तानने तालिबानबरोबर शांतता चर्चा सुरू करण्यात ठोस भूमिका घेणे आवश्‍यक आहे, असे मॅटिस म्हणाले. पाकिस्तानची अफगाणिस्तानमधील भूमिकेवरच त्यांच्याबरोबरील संबंध कसे ठेवायचे हे ठरवू, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना सांगितले असल्याचेही मॅटिस यांनी निदर्शनास आणून दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Defense relations will be Strong