अमेरिकेत लोकशाही धोक्‍यात ; "डेमोक्रॅट' सीमा नंदांचा हल्लाबोल

पीटीआय
सोमवार, 9 जुलै 2018

ट्रम्प प्रशासनाकडून दररोज एका संस्थेला आव्हान दिले जात असून, अमेरिकेत लोकशाही धोक्‍यात आली आहे. 

- सीमा नंदा, डेमोक्रॅटिक राष्ट्रीय समितीच्या सीईओ 

वॉशिंग्टन : अमेरिकेतील लोकशाही धोक्‍यात आली असून, दररोज एका संस्थेवर हल्ला होत असल्याचा घणाघाती आरोप डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय समितीच्या नवनियुक्त "सीईओ' सीमा नंदा यांनी आज केला आहे. ट्रम्प प्रशासनाकडून लोकशाही मूल्यांचा गळा घोटला जात असल्याचा आरोपही भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक असलेल्या नंदा यांनी केला. 

डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) मागील महिन्यात नंदा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिकेतील मोठ्या राजकीय पक्षाच्या "सीईओ'पदी नियुक्त होणाऱ्या नंदा या भारतीय-अमेरिकी समुदायातील पहिल्याच नागरिक आहेत. डेमोक्रॅटिक पक्षात शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय समितीच्या नियमित कामकाजाची जबाबदारी नंदा यांच्यावर आहे.

पक्षाच्या राष्ट्रीय समितीच्या "सीईओ' म्हणून नंदा यांच्यासमोर नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकांमध्ये विजय प्राप्त करण्याचे मोठे आव्हान आहे. या माध्यमातून अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधिगृहात बहुमत मिळविण्याचे डेमोक्रॅटिक पक्षाचे उद्दिष्ट आहे. ट्रम्प यांचा 18 महिन्यांचा कार्यकाळ हा अमेरिकेसाठी प्रचंड अवघड होता. विद्यमान राजवट लोकशाहीच्या मुळावर उठली आहे, अशी सडकून टीका नंदा यांनी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Democratic threat in the United States