अमेरिकी उत्पादनांवर चीनकडून सवलत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

अमेरिकेसोबत पुढील महिन्यात होणाऱ्या व्यापार चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर चीनने हा निर्णय घेतला आहे. 

बीजिंग : अमेरिकेच्या 16 प्रकारच्या उत्पादनांना अतिरिक्त शुल्कातून सवलत देण्यात येईल, अशी घोषणा चीनने बुधवारी (ता.11) केली. अमेरिकेसोबत पुढील महिन्यात होणाऱ्या व्यापार चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर चीनने हा निर्णय घेतला आहे. 

चीन आणि अमेरिका यांच्यात मागील सुमारे एक वर्षापासून अधिक काळ व्यापार युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांनी एकमेकांच्या उत्पादनांवर अब्जावधी डॉलरचे अतिरिक्त शुल्क आकारले आहे. आज चीनने जाहीर केलेली सवलत 17 सप्टेंबरपासून लागू होणार असून, ती एक वर्षासाठी लागू असेल. सवलत देण्यात येणाऱ्या उत्पादनांमध्ये अमेरिकेतून आयात होणारे सागरी खाद्यपदार्थ आणि कर्करोगविरोधी औषधांचा समावेश आहे.

दरम्यान, चीनने आज प्रथमच सवलत दिलेल्या उत्पादनांची यादी जाहीर केली आहे. सवलत मिळणाऱ्या इतर उत्पादनांमध्ये अल्फाल्फा पेंड, माशांचे खाद्य, वैद्यकीय लिनियर ऍक्‍सलरेटर आणि मोल्ड रिलिज एजंट यांचा समावेश आहे. मात्र, या यादीत सोयाबीन आणि डुकराचे मांस या उत्पादनांचा उल्लेख नाही. 

 
ऑक्‍टोबरच्या चर्चेकडे लक्ष 

चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापार चर्चेची फेरी आता ऑक्‍टोबरच्या सुरवातीला वॉशिंग्टनमध्ये होणार आहे. या चर्चेतून तोडगा निघून जगातील सर्वांत मोठ्या दोन अर्थव्यवस्थांमधील व्यापार युद्ध संपुष्टात येईल, अशी शक्‍यता व्यक्त होत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discounts from China on US products