कुत्रा करतो पाय मोडल्याची ऍक्‍टींग 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

तुम्ही कधी अशी कल्पना केलीय का, की एखादा कुत्रासुद्धा असले नाटक करेल? पण एक हुशार कुत्रा असे नाटक करून लोकांचे लक्ष वेधून अशी सहानुभूती मिळवत आहे. 

 

बॅंकॉक ः आयुष्यात आपण कधीतरी का होईना पण दुखापतीचे खोटे नाटक करून लोकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करतो. आपल्या फायद्यासाठी आपले मित्र आणि आपल्या स्नेहीजनांचादेखील फायदा घेतो. मात्र तुम्ही कधी अशी कल्पना केलीय का, की एखादा कुत्रासुद्धा असले नाटक करेल? पण एक हुशार कुत्रा असे नाटक करून लोकांचे लक्ष वेधून अशी सहानुभूती मिळवत आहे. 

हा स्मार्ट कुत्रा आपला पाय मोडल्याचे नाटक करत रस्त्यावर अंग फरपटत चालतो आणि लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतो. लोकदेखील सहानुभूतीने त्याला खायला देतात. 

तर या कुत्र्याचे नाव "गे" असे असून त्याच्या या हुशारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर स्थानिक लोकांकडून व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ बॅंकॉकमध्ये शूट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये या कुत्र्याच्या मागच्या पायाला दुखापत झाली असून तो पाय फरपटत रस्त्याने चालताना दिसत आहे. तेव्हा दुचाकीवरून चाललेल्या एका माणसाचे लक्ष त्याच्याकडे जाते आणि कुत्र्याला पाहण्यासाठी थांबतो. त्याच वेळी हा कुत्रा पाय ठीक करून पुन्हा अगदी व्यवस्थित चालायला लागतो. 

कुत्र्यांवर प्रेम करणाऱ्या थावीपॉर्न चोंगप्लापोलकुल यांनी सांगितले की, हा म्हातारा कुत्रा काही वर्षांपासून माझ्या कामाच्या ठिकाणी राहतो. तो लोकांना फसवण्यासाठी नेहमीच हा युक्ती करतो, मी त्याला भात खायला घालतो; पण तरीही त्याची ही सवय आहे. तो खूप हुशार आहे. मला वाटतं की तो लोकांकडूम खायला मिळावे म्हणून असे करतो. थावीपोर्न पुढे म्हणाले, "त्या दिवशी आम्ही त्याला पहायला लागलो तेव्हा दुचाकीस्वारदेखील थांबला. कारण कुत्र्याला दुखापत झाली आहे, असे त्याला वाटले; पण त्याच वेळी कुत्रा उडी मारून पळून गेला आणि ते दृश्‍यदेखील खूपच मजेदार होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The dog does the breaking leg act