Coronavirus: चीनच्या चुकीची किंमत जग मोजते आहे : ट्रम्प 

वृत्तसंस्था
शनिवार, 21 मार्च 2020

‘कान’ महोत्सव पुढे ढकलला 
कोरोनाच्या संसर्गामुळे कान चित्रपट महोत्सव पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा चित्रपट महोत्सव बारा ते २३ मे दरम्यान होणार होता. आता तो जून किंवा जुलैमध्ये होऊ शकतो अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. या महोत्सवामध्ये जगभरातून ४० हजार प्रतिनिधी सहभागी होणार होते. 

वॉशिंग्टन : जगाला झालेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला जबाबदार ठरविले आहे. चीनने या विषाणूची प्राथमिक टप्प्यातील माहिती दडवून ठेवल्याने आज जगाला त्याची मोठी किंमत चुकवावी लागत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

या विषाणूच्या संसर्गाबाबत काही महिने आधीच माहिती मिळाली असती तर अधिक चांगले झाले असते. यामुळे चीनमधील ज्या भागामध्ये या विषाणूचा उद्रेक झाला आहे त्या भागापुरताच तो मर्यादित ठेवता आला असता, असेही ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले. जगातील १४५ पेक्षाही अधिक देशांमध्ये पसरलेल्या या विषाणूची दोन लाखांपेक्षाही अधिक लोकांना बाधा झाली असून, दहा हजार जणांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. अमेरिकेच्या सुरक्षा परिषदेने काही दिवसांपूर्वी चिनी सरकारवर टीका करणारे ट्विट केले होते, त्याबाबत पत्रकारांनी छेडले असता ट्रम्प यांनी उपरोक्त भाष्य केले. दरम्यान, अमेरिकेच्या सुरक्षा परिषदेने केलेल्या ट्विटमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गासाठी चिनी कम्युनिस्ट पक्षाला जबाबदार धरले होते. कारण याच सत्ताधारी पक्षाने कोरोना विषाणूशी संबंधित प्राथमिक माहिती दडवून ठेवल्याचा आरोप अमेरिकेकडून करण्यात आला होता. 

‘कान’ महोत्सव पुढे ढकलला 
कोरोनाच्या संसर्गामुळे कान चित्रपट महोत्सव पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा चित्रपट महोत्सव बारा ते २३ मे दरम्यान होणार होता. आता तो जून किंवा जुलैमध्ये होऊ शकतो अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. या महोत्सवामध्ये जगभरातून ४० हजार प्रतिनिधी सहभागी होणार होते. 

यूट्युब, नेटफ्लिक्सवर निर्बंध 
विषाणू संसर्गाने बाधित झालेल्या युरोप खंडामध्ये आता सर्वचजणांनी घरी बसून ऑनलाइन कामे करायला सुरुवात केली असून, मनोरंजनासाठी यूट्युब आणि नेटफ्लिक्ससारख्या ओटीपी प्लॅटफॉर्मवर सर्वजण अवलंबून असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. इंटरनेटवर येणार ताण लक्षात घेऊन यूट्युबने युरोपातील उच्च दर्जाचे स्ट्रीमिंग कमी केले असून नेटफ्लिक्सनेदेखील तोच कित्ता गिरवला आहे. मागील काही दिवसांमध्ये युरोपातील इंटरनेटचा वापर लक्षणीयरीत्या वाढला आहे. 

नासालाही मोठा फटका 
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासालाही या कोरोनाच्या संसर्गाचा जबर फटका बसला असून, या संस्थेला दोन प्रक्षेपण केंद्रे बंद करावी लागली आहेत. ही दोन्ही केंद्रे न्यू ऑर्लिन्स या प्रांतातील आहेत. येथेच मून रॉकेट आणि प्रक्षेपण यंत्रणा तयार केली जाते. मिसीसीपी प्रांतातील स्टेनिस स्पेस सेंटरही बंद करण्यात आले असून येथे रॉकेटच्या बूस्टरची चाचणी घेण्यात येते. यामुळे अमेरिकेच्या २०२४ मधील प्रस्तावित अंतराळ मोहिमेलाही फटका बसू शकतो. 

इटलीतील मृत चीनपेक्षा अधिक 
मागील चोवीस तासांमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढला असून येथील मृतांचा आकडा साडेतीन हजारांच्याही पुढे गेला आहे. ही संख्या चीनपेक्षाही अधिक आहे. जगभरातील मृतांच्या आकड्याने आज दहा हजाराला स्पर्श केला. इटलीतील बाधितांची संख्या ४१ हजारांवर गेली आहे. जर्मनी, इराण आणि स्पेनमधील बाधितांच्या संख्येमध्येही वाढ झाली आहे. 

जगभरात 
इंडोनेशियातील बाधितांची संख्या ६० वर 
हाँगकाँगमध्ये सामूहिक संसर्ग, बाधितांची संख्या ४८ 
फिलिपिन्समध्ये पर्यटकांवर बंदी 
सौदी अरेबियात मशिदीतील प्रार्थनांवर बंदी 
जर्मनीत विषाणूशी लष्कर करणार दोन हात 
ब्रिटनमध्ये निवृत्त डॉक्टरांना कामासाठी बोलावले 
जपानमध्ये चेरी मोसमावर कोरोनामुळे पाणी 
रोजगार वाचविण्यासाठी ब्रिटन देणार पॅकेज 
कॅलिफोनिर्यामध्ये पूर्णपणे टाळेबंदी 
युरोपातून येणाऱ्या प्रत्येकाची द. कोरियात चाचणी 
हॉलिवूडमधील सर्व चित्रपटांचे चित्रीकरण थांबले 
जी-७ देशांची जूनमधील बैठक अखेर रद्द 
श्रीलंकेमध्ये अनेक भागांत संचारबंदी लागू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Donald Trump is calling coronavirus the China virusDonald Trump is calling coronavirus the China virus