
अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राष्ट्राध्यक्षावर दुसऱ्यांदा महाभियोग प्रस्ताव मंजूर होण्याची नामुष्की ओढावली आहे.
वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे. अमेरिकेच्या काँग्रेसमधील प्रतिनिधिगृहात म्हणजेच कॅपिटॉल हिल येथील हिंसाचारप्रकरणाचा ठपका ठेवत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्यात आली. अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरूद्ध दुसरा महाभियोग प्रस्ताव पारित करण्यात आला. महाभियोगावरील चर्चेनंतर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राष्ट्राध्यक्षावर दुसऱ्यांदा महाभियोग प्रस्ताव दाखल होण्याची नामुष्की ओढावली आहे.
Majority of US House votes to impeach US President Donald Trump: AFP news agency https://t.co/C90g8ygIm1
— ANI (@ANI) January 13, 2021
त्यांच्याविरोधातील हा महाभियोगाचा प्रस्ताव 197 च्या विरोधात 232 मतांनी संमत झाला आहे. विशेष म्हणजे 10 रिपब्लिकन खासदारांनी देखील या महाभियोगाच्या बाजूने मतदान केले आहे. आता हा प्रस्ताव 19 जानेवारीला सिनेटमध्ये आणला जाईल.
कॅपिटल हिल हिंसाचारात 5 जणांचा मृत्यू झाला होता. प्रतिनिधिगृहाने महाभियोगाची कारवाई सुरू करण्यापूर्वी उपाध्यक्ष माईक पेन्स यांना पंचविसाव्या घटना दुरुस्तीनुसार अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गच्छंती करण्यास सांगितले आहे. याबाबतचा ठराव 223 विरुद्ध 205 मतांनी मंजूर झाला होता.