कोणत्याही पूर्वअटीशिवाय उत्तर कोरियाशी चर्चेस तयार : ट्रम्प

वृत्तसंस्था
रविवार, 7 जानेवारी 2018

उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये दोन वर्षांच्या खंडानंतर पुढील आठवड्यात प्रथमच अधिकृतपणे चर्चा होत आहे. या पार्श्‍वभूमीवर ट्रम्प यांना पत्रकारांनी प्रश्‍न विचारले असता, त्यांनी हा चांगला बदल असल्याचे मत व्यक्त केले. तसेच कोणत्याही पूर्वअटीशिवाय आपणही किम जोंग उन यांच्याशी बोलण्यास तयार आहोत, असे ट्रम्प म्हणाले

कॅंप डेव्हिड (अमेरिका) - उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करण्यास तयार असल्याचे अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सांगितले. तसेच उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यात चर्चा सुरू होऊन सकारात्मक परिणाम होईल, अशी अपेक्षाही ट्रम्प यांनी व्यक्त केली.

उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये दोन वर्षांच्या खंडानंतर पुढील आठवड्यात प्रथमच अधिकृतपणे चर्चा होत आहे. या पार्श्‍वभूमीवर ट्रम्प यांना पत्रकारांनी प्रश्‍न विचारले असता, त्यांनी हा चांगला बदल असल्याचे मत व्यक्त केले. तसेच कोणत्याही पूर्वअटीशिवाय आपणही किम जोंग उन यांच्याशी बोलण्यास तयार आहोत, असे ट्रम्प म्हणाले. गेल्या वर्षभरात ट्रम्प आणि किम जोंग उन यांनी एकमेकांवर केवळ चिखलफेकच केली आहे. "उत्तर आणि दक्षिण कोरियामध्ये चर्चा होत आहे, ही मोठी सुरवात आहे. मी जर हस्तक्षेप केला नसता तर ही चर्चा झालीच नसती. या चर्चेतून काही चांगले बाहेर येणार असेल तर ती जगासाठी महान बाब ठरेल,' असे ट्रम्प म्हणाले.

पाकबाबत चीनची भूमिका महत्त्वाची
दहशतवाद्यांची आश्रयस्थळे नष्ट करण्यासाठी पाकिस्तानला समजावण्यामध्ये चीन महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो, असे मत "व्हाइट हाउस'मधील वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे. "दहशतवादाच्या मुद्यावर अमेरिकेला वाटत असलेली काळजी चीनला समजत असल्याने ते याबाबतीत एकत्ररीत्या काम करू शकतात. पाकिस्तान आणि चीनचे संबंध पूर्वीपासून चांगले आहेत. त्यांच्यातील आर्थिक आणि संरक्षण व्यवहारही वाढत आहेत. त्यामुळे पाकिस्तानमध्ये आश्रय घेतलेल्या दहशतवाद्यांना संपविण्यासाठी चीनची मदत होऊ शकते,' असे या अधिकाऱ्याने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: donald trump north korea