"जो बायडेन यांचा विजय झाल्यास चीन अमेरिका ताब्यात घेईल"

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 28 August 2020

रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय संमेलनात राष्ट्रपती पदाची उमेदवारी स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी विरोधी उमेदवार जो बायडेन यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

वॉशिंग्टन- रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय संमेलनात राष्ट्रपती पदाची उमेदवारी स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी विरोधी उमेदवार जो बायडेन यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. जो बायडेन राष्ट्रपती बनले तर चीन अमेरिकेवर ताबा मिळवेल आणि अमेरिकी जनतेने त्यांना पुन्हा संधी दिली तर ते कोरोना संकटासाठी बिजिंगला जाब विचारतील, असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं आहे. 

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचा राजीनामा

जो बायडेन यांचा अजेंडा मेड इन चायना आहे आणि माझा अजेंडा मेड इन अमेरिका आहे. मी जर पुन्हा राष्ट्रपती झालो, तर येणाऱ्या चार वर्षात अमेरिका उत्पादन क्षेत्रात सुपरपॉवर बनेल. आम्ही देशातील संधी वाढवू आणि पुरवठा साखळीला पुन्हा अमेरिकेत आणलं जाईल. अमेरिकेचे चीनवर असलेले अवलंबित्व पूर्णपणे नष्ट केले जाईल, असं डोनाल्ड ट्रम्प आपल्या भाषणात म्हणाले आहेत. 

वॉशिंग्टनमधील काही लोक मला चीनविरोधात उभे राहू नका असं सांगत होते, पण मी अमेरिकी जनतेला वचन दिलं आहे. आम्ही इतिहासात चीनविरोधात सर्वात कठोर, सर्वात साहसपूर्ण आणि सगळ्यात जोरदार अॅक्शन घेतलं आहे, असं ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांनी यावेळी कोरोना महामारीच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. सध्या अमेरिका आणि जग कोरोना महामारीमुळे हैराण आहे. शतकातील सर्वात कठीण समस्येशी आपण सामना करत आहोत. चीनमुळे कोरोना महामारी सर्व जगभरात पसरली, त्यामुळे चीन या सगळ्यासाठी दोषी आहे, असंही ते म्हणाले आहेत. 

100 रुपयांत करा आधार अपडेट; UIDAI ने जारी केली आवश्यक कागदपत्रांची यादी

कोरोनावरील प्रभावी लस निर्मितीचे कार्य प्रगतीपथावर असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. सध्या देशात तीन कोविड लशींचे परिक्षण सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही लस निर्मिती आधीच कोरोना लशीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करत आहोत, त्यामुळे लस प्रभावी ठरेपर्यंत आपल्याकडे पुरेसा साठा असणार आहे. याच वर्षी आम्ही कोरोनावरील प्रभावी लस तयार करु. आपण सर्व मिळून कोरोना विषाणूला हरवू, असं ट्रम्प म्हणाले. अमेरिकाच्या राष्ट्रपतींनी वचन दिलं की, अमेरिका सर्वात आधी महिला अंतराळवीराला चंद्रावर उतरवेल आणि अमेरिका पहिला देश असेल ज्याने मंगळवार आपला झेंडा फडकवला. 

दरम्यान, अमेरिकेत 3 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रपती पदासाठी डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन हे समोरासमोर आहेत. ट्रम्प यांना पुन्हा राष्ट्रपती होण्याची संधी असली तरी यावेळी त्यांचा मार्ग खडतर असणार आहे. 

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: donald trump said china will capture amercia if joe biden win