ट्रम्प यांचे जावई कुशनर इराकच्या दौऱ्यावर

वृत्तसंस्था
सोमवार, 3 एप्रिल 2017

इराकी पंतप्रधान हैदर अल-आबादी यांनी प्रथम 20 मार्च रोजी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई आणि व्हाईट हाऊसचे वरिष्ठ सल्लागार जेरेड कुशनर हे इराकच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. अमेरिकन लष्कराचे प्रमुख मरीन जनरल जोसेफ डनफोर्ड हेही त्यांच्यासोबत असल्याचे ट्रम्प प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

कुशनर यांना स्वतःला इराक पाहायचे होते आणि इराकी सरकारला पाठिंबा दर्शविण्याची इच्छा होती, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. 'फायनान्शल एक्सप्रेस'ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले असून, न्यूयॉर्क टाइम्सच्या वार्ताहरानेही ट्विटरवरून त्याला दुजोरा दिला आहे. 

इराकी पंतप्रधान हैदर अल-आबादी यांनी प्रथम 20 मार्च रोजी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी सांगितले की, इस्लामिक स्टेट तथा इसिसशी लढण्यासाठी अमेरिकेचा भरीव पाठिंब्याचे आश्वासन आम्हाला मिळाले आहे. परंतु, केवळ लष्करी सामर्थ्य हे त्यासाठी पुरेसे ठरणार नाही, असेही त्यांनी म्हटले होते. 

ट्रम्प यांनी 20 जानेवारी रोजी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यावर कट्टरवादी इसिसला संपवण्यासाठी नवे धोरण आखण्याचे सूतोवाच केले होते. इसिसने 2014 मध्ये इराक आणि सीरियातील मोठ्या भूभागांवर ताबा मिळवला होता. दरम्यान, ट्रम्प सत्तेवर येण्यापूर्वी अमेरिकाप्रणित संयुक्त लष्कराचे हवाई हल्ले आणि सल्लागार यांच्या साह्याने इसिसच्या ताब्यातील काही भूभाग पुन्हा मिळविण्यात इराकला यश आले आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: donald trump's son in law kushner on iraq visit