चीनच्या सिनोव्हॅक कंपनीच्या 90 टक्के कर्मचाऱ्यांना कोरोना लशीचा डोस

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 6 September 2020

सिनोव्हॅक बायोटेक कंपनीच्या 90 टक्के कर्मचारी आणि कुटुंबियांना कोरोनावरील प्रायोगिक लशीचा डोस देण्यात आला आहे.

बीजिंग-  सिनोव्हॅक बायोटेक कंपनीच्या 90 टक्के कर्मचारी आणि कुटुंबियांना कोरोनावरील प्रायोगिक लशीचा डोस देण्यात आला आहे. ही संख्या दोन ते तीन हजारच्या दरम्यान आहे. या व्यक्ती त्यात स्वेच्छेने सहभागी झाल्या.

कंपनीचे सीईओ यीन वेईडाँग यांनी ही माहिती दिली. आणीबाणीचा उपक्रम म्हणून ही लस तयार करण्यात आली आहे. जुलैमध्ये त्यास प्रारंभ झाला. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे या रोगप्रतिबंधात्मक लशीपासून कसे संरक्षण होत आहे याचा तपशील मात्र फारसा देण्यात आलेला नाही. वैद्यकीय, फूड मार्केट, वाहतूक आणि सेवा या क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांसाठी हा उपक्रम आखण्यात आला. दुसरीकडे तिसऱ्या टप्प्यातील चाचण्याही सुरू आहेत.

या उपक्रमातून आकडेवारी संकलित करण्यात आली, पण प्रयोगशाळेतील नोंदणीकृत चाचण्यांच्या निकषासाठी त्याचा विचार होणार नाही. त्याचवेळी लशीचे परीक्षण आणि व्यावसायिक कारणासाठी ती प्रमाणित करण्याच्या प्रक्रियेचाही हा भाग नसेल.

सलाम! रुग्णसेवेसाठी धावला वर्दीतला डॉक्टर; पोलिस अधीक्षकाने जिंकली मने

वेईडाँग यांनी सांगितले की, आपण स्वतः, आपली पत्नी आणि पालकांनीही डोस घेतला. त्यांना त्याआधी संभाव्य दुष्परिणामांची माहिती देण्यात आली होती. लस अद्याप प्राथमिक टप्प्यात असून चाचण्यांचा मधला टप्पा सुरू असल्याची कल्पनाही देण्यात आली होती. डोस देण्यापूर्वी डॉक्टरांनी प्रकृती कशी आहे याविषयी माहिती घेतली. डोस दिल्यानंतर प्रतिकूल परिणामांचे प्रमाण बरेच कमी दिसले.

कोरोना संसर्गाची नव्याने लाट आल्यास लशीच्या उत्पादनावर थेट परिणाम होऊ शकतो. लशीचे संशोधक आणि उत्पादक या नात्याने आम्हाला याची कल्पना आहे. त्यामुळे आमच्या कंपनीना आणबाणीच्या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले, असं सिनोव्हॅकचे सीईओ यीन वेईडाँग म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A dose of corona vaccine is given to 90 percent of employees of China's Sinovac company