दुबईच्या पंतप्रधानांच्या पत्नीचे 'यूएई'ला पलायन 

वृत्तसंस्था
रविवार, 30 जून 2019

- दुबईच्या राजकन्येचे 'यूएई'ला पलायन
- जर्मन अधिकाऱ्यांनी मदत केल्याचा संशय 

 

दुबई : दुबईच्या राजकन्या हया बिंत अल हुसैन यांनी घटस्फोटानंतर संयुक्त अरब अमिरातीला (यूएई) पळ काढला असून, त्या अब्जाधीश शेख मोहमंद बिन रशीद अल मख्तूम यांच्या सहाव्या पत्नी आहेत. हया यांनी 31 दशलक्ष पौंड आणि दोन मुलांसह दुबई सोडल्याचे बोलले जाते. शेख अल मख्तूम हे संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) उपाध्यक्ष आणि पंतप्रधानदेखील होते. हया बिंत या सध्या लंडनमध्ये लपून बसल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राजकन्या हया या जॉर्डनचे राजे अब्दुल्लाह यांची सावत्र बहीण असून, त्यांनी आपली दोन मुले जालीला (वय 11) आणि झायेद (वय 7) यांच्यासह जर्मनीकडे राजाश्रय मागितला होता. नव्याने आयुष्य सुरू करण्यासाठी हया यांनी 31 दशलक्ष पौंड एवढी रक्कम पतीकडून घेतल्याचे समजते. ऑक्‍सफर्डमध्ये शिकलेल्या हया 20 मे पासून सार्वजनिक जीवनातून अदृश्‍य झाल्या होत्या. फेब्रुवारीपासून त्यांचे सोशल मीडिया अकाउंटदेखील ऍक्‍टिव्ह नव्हते. 

जर्मनीकडे साकडे 
अरब माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, एका जर्मन राजनैतिक अधिकाऱ्यानेच हया यांना दुबईतून पळून जाण्यासाठी मदत केल्याचे समजते. यामुळे दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढला आहे. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेख मोहमंद बिन रशीद अल मख्तूम यांनी आपल्या पत्नीला दुबईला परत पाठविण्यात यावे, अशी विनंती जर्मनीकडे केली होती; पण ती फेटाळून लावण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी शेख यांची कन्या लतिफा यांनी दुबईमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय किनारपट्टीवर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्या काही काळ गायब झाल्या होत्या. सध्या त्याही यूएईच्या ताब्यात असल्याचे बोलले जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dubai Princess Flees UAE With Money, Kids Post Marriage Break-Up

टॅग्स