चीनमधील ई-कॉमर्स उपक्रम 'जेडी डॉट कॉम' 

drone
drone

शांघय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या आमंत्रणावरून गेल्या महिन्यात केलेल्या चीनच्या दौऱ्यात 26 ऑक्‍टोबर रोजी शियान शहरात सायंकाळी "जेडी डॉट कॉम" या कंपनीला भेट नियोजित होती. किरकोळ व्यापार करणारी ही चीनमधील सर्वात मोठी कंपनी. 2017 मध्ये कंपनीची उलाढाल 55.7 अब्ज डॉलर्स होती. कंपनीचे आंतरराष्ट्रीय संपर्क संचालक श्री व्हिक गो आमची वाट पाहाता होते.

भल्या मोठ्या मोकळ्या पटांगणाच्या मधोमध हॅलिपॅडसारखे "ड्रोनपॅड"वर एक ड्रोन उभे होते. व्हिक आम्हाला त्याचे प्रात्यक्षिक दाखविणार होते. काही वेळातच ड्रोन च्या पोटाशी दहा किलोचे चौकोनी खोके बांधण्यात आले. जवळच असलेल्या अभियंत्याने आदेश देताच ड्रोनचे पंखे वेगाने फिरू लागले व क्षणातच ते उडाले. दोनशे फुटावर गेल्यानंतर त्याने उत्तरेच्या दिशेने प्रवास सुरू केला. व्हिक म्हणाले, की शियाननजिकच्या शंभर गावांमध्ये ड्रोन्स द्वारे वस्तू पोहोचविल्या जातात. वस्तू पोहोचवून सुमारे वीस मिनिटात ड्रोन परत आले. ड्रोनचा पल्ला पाच ते तीस कि.मी. असून, त्याने आजवर 20 हजार उड्डाणे करून ग्रामीण भागात मालाचे वाटप केलय. आजपर्यंत कंपनीने 1 लाख चाळीस हजार ऑर्डर्स पोहोचविल्या आहेत. त्यासाठी ड्रोन्सनी 1 लाख 20 हजार कि.मी. चा प्रवास केला आहे. ड्रोन्सद्वारे माल पोहोचविण्याची सुरूवात कंपनीने 2015 मध्ये केली. विशेष म्हणजे, ज्या ग्रामीण भागात पायाभूत सोयी नाही, उंच टेकड्यांवर अथवा दरीत गावे आहेत, तेथे वस्तू पोहोचविण्यास ड्रोन्सचाच उपयोग होऊ शकतो. "ते केवळ फायदेशीर नाही, तर कार्यक्षमता व पैशाच्या बचतीच्या दृष्टीनेही लाभदायक आहे," असे व्हिक म्हणाले. 

चीनमधील 99 टक्के लोकांना या कंपनीची सेवा उपलब्ध असून, माल त्याचे त्या दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी पोहोचविला जातो. व्हिक म्हणाले, की खोक्‍यातून जाणारा माल सुका असतो. पाण्याच्या बाटल्या अथवा द्रव पदार्थ पाठविले जात नाहीत. ठरलेल्या ठिकाणी माल सुरक्षित पोहोचतो. तेथेही अशीच ड्रोनपॅड्‌स उभारण्यात आली असून, हवाई वाहतुकीला व्यत्यय येऊ नये, म्हणून एका विशिष्ट उंचीवरून ड्रोन उड्डाण करतात. चीनमध्ये सुरू असलेला हा जगातील इतक्‍या मोठ्या प्रमाणावरील पहिला इ-कॉमर्स उपक्रम होय. माहिती देताना व्हिक म्हणाले, की सध्या पाच ते तीस किलोपर्यंत वजनाचा माल पाठविला जात असला, तरी मोठ्या क्षमतेच्या ड्रोन्सद्वारे शेकडो किलोग्राम अथवा काही टन माल नेता येईल काय, यावर कंपनीचे संशोधन सुरू असून, ड्रोन्सची आकाशात टक्कर अथवा अपघात होऊ नये म्हणून त्याचे मार्ग, उंची व स्वयंचलित तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. जेडी डॉट कॉम कंपनीत गुगल, वॉलमार्ट व टेनसेन्ट या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. तसेच, चीनमध्ये सुमारे 1 अब्ज लोकांपर्यंत पोहोचणारा विचॅट या प्लॅटफॉर्म बरोबर व्यूहात्मक भागीदारी आहे. चीनमध्ये कंपनीची पाचशे गुदामे असून, त्यात वस्तूंचे ताजेपण टिकविण्यासाठी हवामान नियंत्रके बसविण्यात आली आहेत. त्यात गृहोपयोगी माल, फॅशनजन्य कपडे आदी वस्तू, खाद्यपदार्थ व लहानमुलांना लागणाऱ्या वस्तू आदी ठेवलेल्या असतात. मागणीनुसार त्यांचा ड्रोन्सद्वारे पुरवठा केला जातो. कंपनीची सात हजार पुरवठा केंद्रे आहेत. येत्या काही वर्षात चीनमध्ये ड्रोन्सचे शेकडो तळ उभारण्यात येणार आहेत. भारताला या उपक्रमापासून बरेच काही शिकण्यासारखे आहे. ड्रोन्स हे संवेदनशील वाहन असून, त्याचा उपयोग शस्त्रास्त्रांच्या वाहतुकीसाठी होऊ नये, म्हणून सुरक्षा यंत्रणांना बरीच काळजी घ्यावी लागेल. 

भारतातही लौकरच "ड्रोन डिलिव्हरी सेवा" सुरू होणार, असा संकेत काल केंद्रीय नागरी हवाई वाहतुक मंत्री जयत सिन्हा यांनी दिला. ही बातमी असंख्यांना आनंदित करणारी आहे. केंद्राच्या ड्रोन -2 या धोरणानुसार ड्रोन्सच्या बहुविध वापरांच्या संदर्भात नियम तयार केले जात असून, 2019 मध्ये त्याचे दृश्‍यरूप देशापुढे येईल, अशी अपेक्षा आहे. 

दरम्यान, चीनमध्ये अलीकडे आणखी एक अभिनव प्रयोग करण्यात आला तो शिनहुआ या वृत्तसंस्थेतर्फे. 9 नोव्हेंबर 2018 रोजी जगातील पहिले वृत्त निवेदन शिनहुआने एका यंत्रमानवाद्वारे केले. झेझियांग प्रांतात केलेल्या या प्रयोगांतर्गत झांग झाव या यंत्रमानवाने इंग्रजीतून बातमीवाचन केले. व्हिडिओतून आलेल्या बातम्या एकत्र करून त्यातून तो वाचन करतो. झांग झाव या वार्ताहरासारखा हुबेहूब दिसणारा हा यंत्रमानव म्हणतो, की तो 24 तास सलग काम करू शकतो. सूट व टाय घातलेला बातमी देणारा यंत्रमानव "यू ट्यूब"वर जाऊन कुणालाही पाहाता येतो. शिनहुवा व सोगोऊ डॉट कॉम च्या संयुक्त संशोधनातून या यंत्रमानवाची निर्मिती करण्यात आली आहे. हाती आलेल्या माहितीवरून तो स्वतः बातम्या तयार करतो. तो म्हणतो, ""आय विल वर्क टायरलेसली टू कीप यू इन्फॉर्म्ड ऍज टेक्‍स्ट्‌स विल बी टाईप्ड इन टू माय सिस्टीम अनइंटरप्टेड. आय लुक फॉरवर्ड टू ब्रिंगिंग यू द ब्रॅंड न्यू न्यूज एक्‍सपिरियन्सेस. "सीएनबीसीच्या वृत्तानुसार, गार्टनर या संशोधन संस्थेच्या भविष्यवाणीनुसार, रोबोटिक (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) क्षेत्रात 2.3 दशलक्ष नवे रोजगार निर्माण होतील,तथापि, 2020 अखेर 1.8 दशलक्ष रोजगार संपुष्टात येतील. गेल्या वर्षी असेही वृत्त आले होते, की युद्धभूमीवर पत्रकाराला जाण्याची गरज नाही, ड्रोन हेच पत्रकार म्हणून युद्धभूमीवर जाऊन तेथील "आखोदेखा हाल" आपल्या कार्यालाकडे पाठवील. तो तसाचे तसा दाखविता येईल. पत्रकाराचा जीव धोक्‍यात घालण्याची गरज पडणार नाही. पण, पत्रकारानं युद्धभूमीवर जाणं व तेथील वृत्त पाठविणं व ड्रोन द्वारे दिल्या जाणाऱ्या बातम्यात दृष्टीकोनाचा फार मोठा फरक असेल, हे निश्‍चित. 

दोन दिवसांपूर्वी कॅलिफोर्नियाहून आलेले वृत्त उद्बोधक आहे. त्यानुसार, तेथील शेतकरी नांगरणी व बीपेरणीसाठी यंत्रमानवाचा वापर करू लागले आहेत. ताज्या भाज्यांचे काप करून ती विकणारी जगातील सर्वात मोठी टेलर कंपनीकडे अनेक यंत्रमानव असून, त्यांच्यावर वेगवेगळी कामे सोपविण्यात आल्याने त्यांना मजुरांची गरज उरलेली नाही. मजूर हे स्थलांतरीत असल्याने ते नेहमीच मिळतील असे नाही. उलट, एक यंत्रमानव एका मिनिटात 60 ते 80 सॅलड बॅग्ज तयार करतो. त्याची कार्यक्षमता मजुरापेक्षा दुप्पट आहे. 2017 मध्ये कॅलिफोर्नियामध्ये मजुरांची 55 टक्के कमतरता भासली होती व जे हंगामी मजूरांवर अवलंबून होते, तिथे ती कमतरता 70 टक्‍क्‍यांवर जाऊन पोहोचली होती. बेरींची शेती करणारी वॅटसनव्हिले कंपनीने बेरीच्या पिकण्याची प्रक्रिया कशी घडते, व ती केव्हा पूर्ण होते, हे पाहाण्यासाठी ऍग्रोबॉट व अन्य कंपन्यात गुंतवणूक केली आहे, तर गेल्या वर्षी लसूण शेती करणाऱ्या ख्रिस्तोफर रॅंच या जगातील मोठ्या कंपनीने लसणाच्या कांद्यांचे जाळीदार पॅकिंग करण्यासाठी तीस फूट उंचीच्या यंत्रमानवाचा उपयोग केला, त्यामुळे कंपनीला अत्यंत वेगाने लसूण सुपरमार्केट्‌सना पाठविता आले. 

असंख्य कारखान्यातून आज ंयंत्रमानवाचा उपयोग होत आहे. यंत्रमानव "वरदान की शाप" या प्रश्‍नाचं उत्तर देणं कठीण. पण याच विषयावर नोबेल पारितोषिक विजेते पुण्याचे प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांची "" वामन परतुनी आला (द रिटर्न ऑफ वामन)" ही अत्यंत रोचक कादंबरी आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात ती प्रत्येकाने वाचली पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com