Turkey-syria Earthquake : भूकंपबळींची संख्या नऊ हजारांवर

दशकातील सर्वांत विनाशकारी भूकंप; बचावकार्याला वेग
Turkey-syria Earthquake
Turkey-syria Earthquake sakal

इस्तंबूल (तुर्की) : भूकंपाने हादरविलेल्या तुर्की आणि सीरियामध्ये एकीकडे ढिगारे उपसण्याच्या कार्याला वेग येत असताना दुसरीकडे मृतांची संख्याही वाढत आहे. या विनाशकारी भूकंपामध्ये बळी पडलेल्यांची संख्या नऊ हजार ४०० पर्यंत गेली आहे. गेल्या दोन दिवसांत तुर्की आणि सीरियाला मिळून भूकंपाचे ४३५ छोटे धक्के बसले आहेत.

भूकंपातील मृतांची संख्या नऊ हजारांच्या वर गेली असल्याने हा गेल्या दशकभरातील हा सर्वांत विनाशकारी भूकंप ठरला आहे. नेपाळला २०१५ मध्ये बसलेल्या ७.८ रिश्‍टरच्या भूकंपाच्या धक्क्यात ८,८०० जणांचा मृत्यू झाला होता.

तुर्की आणि सीरियात साठ हजारांहून अधिक बचाव आणि मदत पथकांचे जवान जनतेला मदत करत आहेत. आज एका स्लॅबखाली अडकलेल्या लहान मुलाला अनेक प्रयत्नांनी बाहेर काढण्यात आले. त्याचे वडिलही भूकंपात थोडक्यात वाचले होते. आतापर्यंत साधारण आठ हजार लोकांना वाचविण्यात आले आहे.

बचावकार्याला वेग

कोसळलेल्या इमारतींमधून नागरिकांची सुटका करण्यासाठी विविध देशांच्या बचाव आणि मदत पथकांनी तुर्की आणि सीरियामध्ये वेगाने काम सुरु केले आहे. अनेक देशांमधून आणखी पथके दाखल होत आहेत. मदत पथकांद्वारे आवश्‍यक त्या वस्तूंचा आणि सेवांचा पुरवठा केला जात आहे. श्‍वान पथकांद्वारे ढिगाऱ्यांखाली अडकलेल्यांचा शोध घेतला जात आहे.

सीरियालाही भारताची मदत

नवी दिल्ली : तुर्कीपाठोपाठ आता भूकंपग्रस्त सीरियाला देखील भारताने मदत साहित्य पाठवले आहे. वायव्य सीरियामध्ये ६ फेब्रुवारीला आलेल्या भीषण भूकंपाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने हवाई दलाच्या विशेष विमानाद्वारे सहा टन आपत्कालीन मदत साहित्य पाठविले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. हे मदत साहित्य सीरियात पोचले असून दमिष्क विमानतळावर आज सकाळी भारताचे सीरियामधील विशेष अधिकारी (शार्झ डी अफेअर) एस के यादव यांनी सीरियाचे स्थानिक प्रशासन आणि पर्यावरण उपमंत्री मुताज दौजी यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द केले.

यामध्ये रुग्ण तपासणीसाठी लागणारे पोर्टेबल ईसीजी मशिन मॉनिटर तसेच अन्य उपकरणे आणि औषधांचा समावेश आहे. भारताने द्विपक्षीय आणि बहुपक्षीय माध्यमांद्वारे सीरीयाला मानवतेच्या दृष्टिकोनातून तसेच तांत्रिक आणि विकासोपयोगी मदत नियमितपणे केली आहे.

कोरोना काळातही वेळोवेळी सीरियाला अन्नधान्य आणि औषधांच्या मदतीची खेप पाठवली होती. तर डिसेंबर २०२० आणि अलीकडेच भारताने सीरियामध्ये कृत्रिम अवयव (जयपूर फूट) बसविण्याची दोन शिबिरे घेतली असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com