भविष्यातील तंत्रज्ञानाचा शिक्षणतज्ज्ञांनी घेतला वेध

सम्राट फडणीस - सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

तेल अविव - केवळ सहज उपलब्ध होणाऱ्या तंत्रज्ञानाचाच नव्हे; तर भविष्यात येऊ पाहणाऱ्या तंत्रज्ञानाचा वेध घेऊन त्याचा सर्वोत्तम वापर करण्याची इस्रायली शिक्षण तज्ज्ञांची जिद्द आहे. एज्युकॉन २०१६ शैक्षणिक परिषदेच्या निमित्ताने इस्राईल दौऱ्यावर असलेल्या भारतीय शिक्षणतज्ज्ञांनी इंटर डिसिप्लिनरी सेंटर-आयडीसी हर्जलिया या ख्यातनाम विद्यापीठात हा अनुभव घेतला. 

 

 

तेल अविव - ‘एज्युकॉन’ परिषदेदरम्यान बुधवारी हर्जलिया विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष युरील राईशमन यांच्याशी चर्चा करताना ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार.

 

तेल अविव - केवळ सहज उपलब्ध होणाऱ्या तंत्रज्ञानाचाच नव्हे; तर भविष्यात येऊ पाहणाऱ्या तंत्रज्ञानाचा वेध घेऊन त्याचा सर्वोत्तम वापर करण्याची इस्रायली शिक्षण तज्ज्ञांची जिद्द आहे. एज्युकॉन २०१६ शैक्षणिक परिषदेच्या निमित्ताने इस्राईल दौऱ्यावर असलेल्या भारतीय शिक्षणतज्ज्ञांनी इंटर डिसिप्लिनरी सेंटर-आयडीसी हर्जलिया या ख्यातनाम विद्यापीठात हा अनुभव घेतला. 

 

 

तेल अविव - ‘एज्युकॉन’ परिषदेदरम्यान बुधवारी हर्जलिया विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष युरील राईशमन यांच्याशी चर्चा करताना ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार.

 

तंत्रज्ञानाचा व्यावहारिक वापर करण्याकडे आवर्जून लक्ष पुरविणाऱ्या इस्रायली स्वभावाचा उत्तम नमुना एज्युकॉन २०१६ मध्ये सहभागी भारतीयांना दिसला. वर्षानुवर्षे धुमसत असलेल्या इस्राईल-पॅलेस्टिन वादाला मूठमाती देऊन यादीन कौफमन या गुंतवणूकदाराने पॅलेस्टिनमधील ‘स्टार्ट-अप’मध्ये केलेली गुंतवणूक आणि त्यातून उभे केलेले सामाजिक गुंतवणूक-परताव्याचे वेगळे मॉडेल भारतीय शिक्षणतज्ज्ञांना अवाक करणारे ठरले.

 

जगातील सर्वोत्तम स्मार्ट सिटी तेल अविव येथे झालेल्या दोन दिवसांच्या एज्युकॉन २०१६ चा बुधवारी आयडीसी हर्जलिया या विशाल खासगी विद्यापीठात समारोप झाला. तेल अविव विद्यापीठात सुरू झालेले ‘उद्यमशीलता आणि नाविीन्य’ (आंत्र्यप्रिन्युरशिप ॲन्ड इनोव्हेशन) या विषयावरील विचारमंथन आयडीसी हर्जलियामध्ये सर्वोच्च शिखरावर पोचले. 

 

‘तीस वर्षांपूर्वी इस्राईल ऑरेंज (संत्री) जगाला निर्यात करायचा. आज ॲपल इथून जगभर निर्यात केला जातो,’ असे कौफमन यांनी सांगितले. ‘ॲपल’ या जगातील अग्रेसर कंपनीची अमेरिकेबाहेरील सर्वांत मोठी संशोधन आणि विकास प्रयोगशाळा इस्राईलला आहे. तो संदर्भ कौफमन यांच्या विधानामागे होता. विज्ञान-तंत्रज्ञानातील नव्या विचारांची देवाणघेवाण ‘टेड टॉक’ या व्याख्यानांच्या मालिकेतून जगभर होते. या मालिकेत कौफमन यांना यापूर्वी मुद्दाम बोलावले गेले होते. ‘‘इस्राईल स्टार्ट अप नेशन मानले जात आहे. मात्र, आमच्यासमोर दोन प्रमुख अडचणी आहेत आणि त्या म्हणजे आमच्या समाजात फार मोठी दरी आहे; शिवाय आमच्या भोवताली शांतता नाही,’’ कौफमन यांनी मोकळेपणाने सांगितलेल्या या सत्याला उपस्थितांनी टाळ्यांनी दाद दिली.

 

तंत्रज्ञानाच्या वापराचा समाजाला उपयोग झालाच पाहिजे, हे सांगणाऱ्या कौफमन यांनी त्यांनी उभ्या केलेल्या १.३४ कोटी डॉलरच्या सामाजिक निधीचे उदाहरण दिले. स्टार्ट अप कंपन्यांनी कौफमन यांच्या सामाजिक संस्थेला डोनेशन म्हणून कंपनीचे शेअर्स दिले आणि पुढे जेव्हा या कंपन्या बलाढ्य बनल्या, त्या वेळी शेअर विकून कौफमन यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उभा केला. ‘इस्राईल आणि पॅलेस्टिनचे संबंध नेहमीच धुमसते राहिले. मात्र, याचा अर्थ पॅलेस्टिनमध्ये काही गुंतवणूक शक्‍य नाही, असा अजिबात नाही,’ असे सांगत कौफमन यांनी पॅलेस्टिनमध्ये उभ्या राहिलेल्या स्टार्ट अप कंपन्यांबद्दल माहिती दिली.

दिवसभरातील सर्व चर्चासत्रांना आवर्जून उपस्थित राहिलेले आयडीसी हर्जलियाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. युरील राईशमन यांनी, ‘आयडीसी हर्जलियाचे हेतूच मुळी भविष्यातील नेतृत्व तयार करण्याचा आहे,’ हे सुरवातीलाच स्पष्ट केले. ‘‘विद्यार्थ्यांना कुठल्याही विषयाचे ‘प्रॅक्‍टिकल नॉलेज’ मिळणे आम्हाला फार महत्त्वाचे वाटते. त्यामुळेच, आयडीसी हर्जलियामधील कोणत्याही विभागात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला समाजात काही ठोस स्वरूपाची भर घालता येते,’’ हे राईशमन यांचे विधान एज्युकॉन २०१६ मधील सहभागी शिक्षणतज्ज्ञांना आणि संशोधकांना पटणारे ठरले; कारण इस्राईलने आतापर्यंतच्या ऑलिंपिकमध्ये मिळवलेल्या नऊपैकी चार सुवर्णपदके याच संस्थेच्या विद्यार्थ्यांनी मिळविल्याचे राईशमन यांनी अभिमानाने सांगितले. 

 

इस्राईलचे माजी अध्यक्ष शिमॉन पेरेस आणि आयडीसी हर्जलियाचे संस्थापक राईशमन यांचे जिव्हाळ्याचे संबंध. बुधवारीच पेरेस यांचे निधन झाले; तरीही राईशमन यांनी परिषदेस पूर्ण वेळ उपस्थिती ठेवली. परिषदेच्या सुरवातीसच पेरेस यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तेल अविवच्या जवळ वसलेली आयडीसी हर्जलिया स्थानिकांच्याही अभिमानाचा विषय असल्याचे हर्जलियाचे महापौर मोशे फाद्‌लन यांनी सांगितले. फाद्‌लन यांनी हिब्रूमधून परिषदेला संबोधित केले.

सहभागी तज्ज्ञांना काय वाटते...?

भविष्यातील विद्यापीठे कशी हवीत, याचे ज्ञान एज्युकॉन २०१६ मधून मिळाले. विज्ञान-तंत्रज्ञान, शेती आणि अन्य क्षेत्रात नावीन्याचा शोध घेत राहिल्यास जग हे मानवासाठी अधिकाधिक राहण्याजोगे करता येईल, हा संदेश परिषदेतून मिळाला. 

- डॉ. खुर्शिद जामदार, अधिष्ठाता (नर्सिंग), डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे

- डॉ. तुषार पालेकर, अधिष्ठाता (फिजिओथेरपी), डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे

इस्रायली विद्यापीठांमध्ये शिक्षणाचा उद्देश केवळ पदवीधर निर्माण करण्याचा नाही; तर समाजातील प्रश्नांची उत्तरे शोधणारे उद्योजक बनविण्याचा आहे, हे दिसले. बाजारपेठेतील प्रत्यक्ष गरजांवर इथे काम केले जाते. आपल्या शेती, शिक्षण आणि उद्योगजगताने इस्राईलकडून शिकण्यासारखे आहे. 

- सुनील पाटील, अध्यक्ष, प्रबोधन बहुउद्देशीय सोसायटी, नाशिक

एज्युकॉनसाठी इस्राईलची निवड अचूक होती. तेल अविवला ‘स्टार्ट अप’ची राजधानी मानतात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ख्यातनाम संशोधकांशी, तज्ज्ञांशी प्रत्यक्ष चर्चेची संधी या परिषदेतून मिळाली. देशाच्या उभारणीमध्ये शिक्षण संस्था काय भूमिका बजावू शकतात, याचा अनुभव इस्राईलमध्ये मिळाला. 

- मनीष शर्मा, एमआयटी, औरंगाबाद.

विविध विद्याशाखांचा समन्वय, कौशल्यविकासावर आधारित शिक्षण, उद्यमशीलतेला प्राधान्य आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना यांचे सर्वोत्तम दर्शन एज्युकॉन २०१६ मधून घडले. 

- डॉ. श्रीपाद भातलवंडे, व्हीआयटी, पुणे

नाशिक स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर तेल अविवसारख्या जगातील सर्वोत्तम स्मार्ट सिटीकडून बरेच काही घेता येईल. आपल्याकडे सुरू असलेल्या कौशल्यविकास कार्यक्रमासाठी इस्राईलमधील ‘स्टार्ट अप’ कार्यक्रमांचा उपयोग होऊ शकेल. 

- मनीषा पवार, संचालक, स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी, नाशिक

Web Title: Educon for educational tranformation in Israel