इलॉन मस्क यांनी पाळला शब्द; ट्विटर पोलनंतर विकले ११० कोटी रुपयांचे शेअर्स | Elon Musk | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Elon Musk

इलॉन मस्क यांनी पाळला शब्द; ट्विटर पोलनंतर विकले ११० कोटी रुपयांचे शेअर्स

टेस्लाचे Tesla मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) इलॉन मस्क Elon Musk यांनी आपल्या कंपनीचे जवळपास १.१ अब्ज डॉलर म्हणजेच ११० कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत. हे शेअर्स विकण्याचा निर्णय घेण्याआधी त्यांनी ट्विटरवर एक 'पोल' घेऊन त्याद्वारे लोकांचं मत विचारलं होतं. टेस्लामधील त्यांच्या १० टक्के शेअर्सची विक्री करावी की नाही असा प्रश्न त्यांनी ट्विटरवरील त्यांच्या ६३ दशलक्ष फॉलोअर्सना विचारलं होतं. ट्विटरवर नेटकरी जे मत मांडतील ते मान्य असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. टेस्ला ही इलेक्ट्रीक कारचं उत्पादन करणारी कंपनी आहे. इलॉन यांनी जवळपास २.२ दशलक्ष शेअर्स मिळवण्याच्या पर्यायाचा वापर करत ९३४,००० शेअर्स विकले.

ट्विटर पोलवर ५७.९ टक्के लोकांनी इलॉन मस्क यांना टेस्लामधील स्वत:च्या मालकीचे १० टक्के शेअर्स विकण्याचा सल्ला दिला. जवळपास ३५ लाख लोकांनी मतदान केलं होतं. अमेरिकेत डेमोक्रॅट्सकडून बिलेनिअर टॅक्सचा प्रस्ताव सादर करण्यात आल्यानंतर इलॉन यांनी हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. या टॅक्सचा वापर जो बायडेन सरकार सामाजिक आणि क्यायमेट चेंजशी निगडीत धोरण पूर्ण करण्यासाठी वापरणार आहे.

शेअर्सची किंमत वाढल्यावर अब्जाधीशांनी त्यांच्या शेअर्सवरील कर भरावा, असं मत काही डेमोक्रॅट्सनी मांडलं होतं. यालाच अनुसरून मस्क यांनी ट्विटरवर पोल घेतला. यासोबतच त्यांनी म्हटलं की, त्यांच्या शेअर्स विक्रीमुळे टेस्ला शेअर्सच्या किंमतीला नुकसान होणार नाही. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ४.३ टक्क्यांच्या रिकव्हरीसह टेस्ला १,०६७.९५ डॉलर्सवर पोहोचली होती. सोमवारपर्यंत पोलवर जवळपास ३५ लाख लोकांनी मतदान केलं. मात्र ट्विटर पोलनंतर टेस्लाच्या शेअर्सच्या किंमतीत घसरण झाल्याचं पहायला मिळालं.

वर्षभरात टेस्लाच्या शेअर्सच्या किंमतीत चांगलीच वाढ झाली आहे. इलॉन मस्क यांच्याकडे टेस्लाची मालकी असल्याने शेअर्सचा मोठा हिस्सा त्यांच्याकडे आहे. त्यामुळे शेअर्समधील तेजीचा मोठा फायदा मस्क यांना झाला. इलॉन मस्क यांची संपत्ती ३०० अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. त्यातच अमेरिकेतील अब्जाधीशांकडून खास कर वसूल करण्याचा विषय समोर आल्यानंतर मस्क यांनी टेस्लामधील आपला १० टक्के हिस्सा विकण्याबाबतचा पोल ट्विटरवर घेतला होता.

loading image
go to top