हॅरिस यांच्यापेक्षा इव्हांका राष्ट्राध्यक्षपदासाठी पात्र - डोनाल्ड ट्रम्प

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 29 August 2020

अमेरिकेच्या उपाध्यक्ष म्हणून कमला हॅरिस यांची पात्रता नाही, असे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केले.

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या उपाध्यक्ष म्हणून कमला हॅरिस यांची पात्रता नाही, असे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केले. याउलट अमेरिकेची पहिली महिला अध्यक्ष म्हणून माझी कन्या आणि सल्लागार इव्हांका ट्रम्प यांच्या नावाची मी शिफारस करेन. कारण ती या पदास पात्र आहे, असेही ते म्हणाले. न्यू हॅम्पशायर येथे रिपब्लिकन पक्षाच्या सभेत ट्रम्प समर्थकांसमोर बोलत होते. ट्रम्प यांनी उपाध्यक्षपदासाठीच्या उमेदवाराची तुलना करत असताना भविष्यात अध्यक्षपदासाठीच्या संभाव्य नावाचा उल्लेख केला.डेमोक्रॅटिक पक्ष अमेरिकी नागरिकांना केवळ स्वप्न दाखवू शकतो, परंतु ते पूर्ण करु शकत नाही, असेही ते म्हणाले. 

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणात कमला हॅरिस यांच्या पात्रतेवरच शंका उपस्थित केली. ते म्हणाले, की त्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत होत्या. मात्र आता उपाध्यक्ष होण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्या मते, माझी कन्या आणि सल्लागार अध्यक्षपदासाठी अधिक पात्र उमेदवार आहे. इव्हांका अमेरिकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा व्हाव्यात अशी आपली इच्छा आहे. या भूमिकेसाठी ती अधिक योग्य उमेदवार ठरू शकते. आता तर काही जण इव्हांकाला दोन्ही पदावर पाहू इच्छित आहेत. यात कमला हॅरिस यांची कोणतिही चूक नाही. कमला हॅरिस वरिष्ठ पदावर बसण्यासाठी पात्र नाहीत, असे ते म्हणाले.

आगामी निवडणुक आपण जिंकणार असून अमेरिकेला अधिक सक्षम आणि मजबूत करण्याचे आश्‍वासन देतो. देशहिताला सर्वोच्च प्राधान्य असून त्या मुद्द्यावरून कधीही तडजोड केली जाणार नाही. आम्ही यापूर्वीही देशाला मजबुतीने पुढे नेले आहे आणि पुढेही करत राहू. अमेरिका कोणापुढेही वाकणार नाही. 
डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष अमेरिका 

 

हे वाचा - भारतीय वंशांच्या हेर नूर यांचा ब्रिटनमध्ये सन्मान; दुसऱ्या महायुद्धात धाडसी कार्य

यादरम्यान रिपब्लिकन पक्षाच्या एका परिषदेत देखील ट्रम्प यांनी बायडेनवर टीका केली होती. त्यानंतर त्यांनी कमला हॅरिसला लक्ष्य केले. कमला हॅरिस या अमेरिकेत वर्णद्वेषाला खतपाणी घालत असल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाकडून केला जात आहे. एवढेच नाही तर हॅरिस यांच्या भूमिकेला डेमोक्रॅटिक पक्ष पाठिंबा देत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. परिणामी आशियाई आणि आफ्रिकी अमेरिकी नागरिकात फूट पडत आहे, असे रिपब्लिकनचे म्हणणे आहे. त्याचवेळी आपण खरे बोलत असल्याने मीडियाचा एक गट आपल्याला जाणीवपूर्वक टार्गेट करत असल्याचाही आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. 

डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकी अध्यक्षपदाची मूळ भूमिका वठवण्यात अपयशी ठरले आहेत. ते अमेरिकी नागरिकांचे संरक्षण करण्यास यशस्वी ठरले नाहीत. 
कमला हॅरिस, डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: evanka is better competent than Harris says Donald trump