सूर्यमालेबाहेरील 'या' ग्रहावर असू शकते जीवसृष्टी... 

वृत्तसंस्था
Monday, 2 March 2020

‘के २-१८ बी’ या ग्रहाच्या हायड्रोजनसमृद्ध वातावरणात वाफेचे अस्तित्व असल्याचे गेल्या वर्षीही दोन वेगवेगळ्या संशोधन पथकांनी सांगितले होते. मात्र, एकूण वातावरणातील वाफेचे प्रमाण आणि प्रत्यक्ष ग्रहावर त्याचे असलेले स्वरूप, याबाबत अनिश्‍चितता होती.

वॉशिंग्टन : अवकाशात जीवसृष्टीचा शोध घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या खगोलशास्त्रज्ञांना आपल्या सूर्यमालेबाहेर जीवसृष्टीला पोषक वातावरण असलेला एक ग्रह आढळून आला आहे. ‘के २-१८ बी’ असे नामकरण झालेला हा ग्रह पृथ्वीपासून १२४ प्रकाशवर्ष दूर आहे. हा ग्रह पृथ्वीहून आकाराने २.६ पट मोठा असून, त्याचे वस्तुमानही पृथ्वीच्या ८.६ पट अधिक आहे. हा ग्रह एका ताऱ्याभोवती ज्या कक्षेतून परिभ्रमण करीत आहे, त्या वातावरणात द्रवस्वरूपात पाण्याचे अस्तित्व असण्याची शक्यता आहे. 

‘के २-१८ बी’ या ग्रहाच्या हायड्रोजनसमृद्ध वातावरणात वाफेचे अस्तित्व असल्याचे गेल्या वर्षीही दोन वेगवेगळ्या संशोधन पथकांनी सांगितले होते. मात्र, एकूण वातावरणातील वाफेचे प्रमाण आणि प्रत्यक्ष ग्रहावर त्याचे असलेले स्वरूप, याबाबत अनिश्‍चितता होती. मात्र, आता केंब्रिज विद्यापीठातील संशोधकांच्या गटाने या ग्रहाचे वस्तुमान, त्रिज्या आणि वातावरण, याबाबतच्या माहितीचा सखोल अभ्यास केला आणि वातावरणात असलेल्या वाफेचे प्रमाण पाहता प्रत्यक्ष ग्रहावर जलस्वरूपात पाणी असण्याची शक्यता असल्याचे आढळून आले. 

‘के २-१८ बी’चा आकार पाहता तो पृथ्वीऐवजी नेपच्यूनची लहान आकारातील आवृत्ती असल्याचे वाटते. त्यामुळे पृथ्वीपेक्षा मोठ्या आकारातील सूर्यमालेबाहेरील ग्रहांवर जीवसृष्टीला पोषक वातावरण असण्याच्या शक्यतेबाबत अभ्यास सुरू झाला आहे. या ग्रहाचा अभ्यास हा पुढील संशोधनासाठी नवीन दिशा दाखविणारा ठरू शकतो. ‘के २-१८ बी’भोवती हायड्रोजन वायूचा थर असण्याची आणि त्यात असलेल्या ग्रहावर पाण्याचे अस्तित्व असण्याची दाट शक्यता आहे. मात्र, हा थर प्रचंड जाड असल्यास आतील प्रचंड तापमान आणि दाबामुळे जीवसृष्टीला पोषक वातावरण असण्याची शक्यता कमी आहे. मात्र, या ग्रहाचा आकार मोठा असला, तरी हायड्रोजन थराची जाडी अधिक असेलच, असे नाही आणि कदाचित ग्रहावर जीवसृष्टीला पोषक वातावरण असेल, असे संशोधन गटात असलेल्या डॉ. निक्कू मधुसूदन यांनी सांगितले. त्यामुळे याबाबत अधिक संशोधन करून निष्कर्ष काढला जाणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The exoplanet K2-18b could be a home for life