समुद्रातील कृत्रिम बेटांद्वारे इंधननिर्मितीचा प्रयोग

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 जून 2019

जगाची भविष्यातील इंधनाची गरज पूर्ण करण्यासाठी समुद्रात फुटबॉलच्या मैदानाच्या आकाराची मोठी कृत्रिम बेटे तयार करण्याचा शास्त्रज्ञांचा मानस आहे.

वॉशिंग्टन ः जगाची भविष्यातील इंधनाची गरज पूर्ण करण्यासाठी समुद्रात फुटबॉलच्या मैदानाच्या आकाराची मोठी कृत्रिम बेटे तयार करण्याचा शास्त्रज्ञांचा मानस आहे. या माध्यमातून वातावरणातील कार्बन डायऑक्‍साईडचे इंधनामध्ये रूपांतर केले जाणार आहे. परिणामी, या प्रयोगामुळे जैवइंधनाचा वापर कमी करणे शक्‍य होणार आहे, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.    
कृत्रिम बेटांची प्रचंड मोठ्या प्रमाणात निर्मिती केल्यास त्यातून जैवइंधनाला समर्थ पर्याय मिळू शकतो, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. त्यामुळे जैवइंधनाचा वापर जवळजवळ शून्यावर आणता येईल, असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे. या प्रस्तावित प्रकल्पाचा आराखडा स्वित्झर्लंड आणि नॉर्वेतील संशोधकांच्या पथकाने तयार केला आहे.

या प्रकल्पाला ‘सोलर मिथॅनॉल आयलॅंड्‌स’ असे नाव देण्यात आले आहे. ‘पीएनएएस’ या अमेरिकेतील प्रतिष्ठित विज्ञान विषय मासिकामध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

अशी असतील कृत्रिम बेटे!
सुमारे १०० मीटर व्यास असलेली कृत्रिम बेटे समुद्राच्या पृष्ठभागावर तयार करण्यात येणार आहेत. कृत्रिम बेटांच्या निर्मितीसाठीचे तंत्रज्ञान सध्या उपलब्ध असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. खोल समुद्रात ज्या ठिकाणी लाटांचे प्रमाण कमी असेल आणि सातत्याने बदलणारे हवामान असणार नाही, अशा ठिकाणी बेटांची निर्मिती करावी लागणार आहे. जगाची इंधनाची गरज भागविण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात ही कृत्रिम बेटे तयार करावी लागतील. या माध्यमातून हवामानबदलांमुळे होणारे गंभीर परिणाम मोठ्या प्रमाणात कमी करण्यास मदत होणार आहे.

इंधननिर्मितीसाठी नवी शक्कल
जगभरातील विमाने, जहाजे, रेल्वे आणि वाहनांसाठीच्या इंधनाची गरज पूर्ण करण्यासाठी नवी अफलातून शक्कल शास्त्रज्ञांनी लढविली आहे. फुटबॉलच्या मैदानाच्या आकाराची कृत्रिम बेटे समुद्राच्या पृष्ठभागावर तयार केली जाणार आहेत. या कृत्रिम बेटांचे कार्य सौरऊर्जेवर चालणार आहे. वातावरणातील कार्बन डायऑक्‍साईडचे रूपांतर इंधनामध्ये करण्याचे काम समुद्रातील ही कृत्रिम बेटे करणार आहेत. 

पर्यावरणपूरक इंधनाची निर्मिती
हवामानबदलांचे गंभीर परिणाम टाळायचे असतील, तर जैवइंधनाचे ज्वलन करणे थांबविण्याशिवाय पर्याय नाही, असे संशोधकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सोलर मिथॅनॉल आयलॅंड्‌सच्या माध्यमातून अपारंपरिक ऊर्जेचा वापर करून वातावरणातील कार्बन डायऑक्‍साईडचे इंधनामध्ये रूपांतर करणे शक्‍य आहे. तसेच, या प्रक्रियेत कार्बन डायऑक्‍साईडचे उत्सर्जनही होणार नाही, जेणे करून पर्यावरणाची हानी होणार नाही, असा संशोधकांचा दावा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Experiment of fuel manufacture in artificial islands of the sea