फेसबुक आणतेय डिजिटल करन्सी

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 जून 2019

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेले फेसबुक आता डिजिटल करन्सी आणणार आहे. फेसबुक येत्या वर्षात बिटकॉइन या क्रिप्टोकरन्सीप्रमाणे "फेसबुक लिब्रा' (Libra) ही क्रिप्टोकरन्सी सादर करणार आहे.

कॅलिफोर्निया : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेले फेसबुक आता डिजिटल करन्सी आणणार आहे. फेसबुक येत्या वर्षात बिटकॉइन या क्रिप्टोकरन्सीप्रमाणे "फेसबुक लिब्रा' (Libra) ही क्रिप्टोकरन्सी सादर करणार आहे. हे एक सुरक्षित चलन असणार असून, फेसबुकमार्फत आर्थिक व्यवहार करण्यासाठी ही क्रिप्टोकरन्सी वापरता येईल, असा दावा फेसबुकने केला आहे. 

लिब्रा या क्रिप्टोकरन्सीचा जगभर प्रसार, प्रचार आणि वापर वाढावा, यासाठी फेसबुक आता जगभरातील अनेक लोकप्रिय ब्रॅंडसोबत करार करणार आहे. क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून सहजपणे व्यवहार करण्यासाठी फेसबुक अतिसुरक्षित पेमेंट प्लॅटफॉर्मवर करीत असून, यामध्ये लिब्रा क्रिप्टोकरन्सी येण्याची शक्‍यता आहे. यावर सध्या चाचणी सुरू असून, भविष्यात लिब्राकरन्सीमार्फत फेसबुक, मेसेंजर आणि व्हॉट्‌सऍपद्वारे पेमेंट करता येईल. 

गेल्या वर्षी बिटकॉइन या "क्रिप्टोकरन्सी'ने 19,783 अमेरिकी डॉलरची उच्चांकी पातळी गाठली होती. तेव्हापासून "क्रिप्टोकरन्सी' सर्वांच्या चर्चेचा विषय झाला. क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून आता डिजिटल पैशांचे व्यवहारही करता येणे शक्‍य होणार आहे. हे डिजिटल कॉइन्स मेसेजप्रमाणेच समोरच्याला सेंड करता येतील. प्रत्येक कॉइनचे डॉलरमध्ये व संबंधित देशांच्या चलनामध्ये मूल्य असेल. यानुसार ठरावीक कॉइन्स पाठवून पैशांचे व्यवहार आता करता येणार आहेत. क्रिप्टोकरन्सी कोणतीही बॅंक नियंत्रित करीत नाही. 

प्रकल्पाची तपासणी होणार 
भारतामध्ये मात्र क्रिप्टोकरन्सीतील व्यवहारांना कायदेशीर मान्यता नाही. शिवाय, जगभरातील बऱ्याच देशांनीदेखील क्रिप्टोकरन्सीला मान्यता दिलेली नाही. त्यामुळे फेसबुकच्या क्रिप्टोकरन्सीला भारतासह इतर देशांत कायदेशीर मान्यता मिळेल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिवाय अमेरिकी कॉंग्रेसही "फेसबुक लिब्रा' (Libra) या क्रिप्टोकरन्सीच्या प्रकल्पाची तपासणी करणार आहे. त्यामुळे कंपनीला "फेसबुक लिब्रा' लॉंच करण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facebook launches Cryptocurrency in bid to shake up global finance