खऱ्याखुऱ्या माशांना वाचवतात प्लास्टिकचे पक्षी, सिलिकाॅन व्हॅलीमध्ये अनोखा प्रयोग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

लुप्त होणाऱ्या प्रजातींना वाचवण्यासाठी, त्यांची शिकार थांबवण्यासाठी मानवावर बंधने लादता येतील; मात्र पक्षी-प्राण्यांचे काय?

न्युयाॅर्क :  लुप्त होणाऱ्या प्रजातींना वाचवण्यासाठी, त्यांची शिकार थांबवण्यासाठी मानवावर बंधने लादता येतील; मात्र पक्षी-प्राण्यांचे काय? त्यामुळे अशा प्रजातींना निसर्गत: पक्षी, प्राण्यांपासून वाचवण्यासाठी काहीतरी अनोखी शक्कल लढवावी लागते. अमेरिकेतील सिलिकाॅन व्हॅलीमध्ये असाच एक प्रयोग केला जात आहे. येथे लुप्त होणाऱ्या काही माशांच्या प्रजातींना वाचवण्यासाठी साल्ट पाॅन्ड परिसरातील बेटांवर चक्क प्लास्टिकचे पक्षी ठेवले जात आहेत.

साधारणत: कावळ्याच्या आकाराचा शुभ्र रंगाच्या आणि लाल चोच असणाऱ्या या पक्षाचे नाव आहे कॅस्पियन टर्न्स. दरवर्षी हे पक्षी मोठ्या संख्येने कॅनडापासून मेक्सिको ते मध्य अमेरिका व तेथून पुढे कोलंबिया नदीच्या किनाऱ्यावर घरटी बनवण्यासाठी तसेच अंडी उबवण्यासाठी येतात. मात्र, येथे आल्यावर त्यांचे मुख्य भक्ष्य
असते ते नदीमधील जंगली प्रजातींचे मासे. तसे पाहता कोलंबिया नदीचे क्षेत्र या प्रजातींच्या माशांसाठी सर्वाधिक सुरक्षित क्षेत्र मानले जाते. मात्र मोठ्या
प्रमाणात होणारी मत्स्यमारी आणि तलावांच्या निर्मितीमुळे त्यांची संख्या 95 टक्क्यांपर्यंत घसरली असून ही प्रजाती नाहीशी होण्याचा धोका वर्तवला जात आहे.

संरक्षणासाठी कायदा
या माशांच्या संरक्षणासाठी अमेरिकेने 'धोकादायक प्रजाती संरक्षण' असा कायदादेखील तयार केला आहे. जेणेकरुन कोणालाही या माशांची शिकार करता येणार नाही. मात्र
या माशांनाच आपले भक्ष्य बनवणाऱ्या कॅस्पियन टर्न्स पक्षाला हा कायदा कसा माहित असणार. विशेष म्हणजे या पक्षांना देखील विशेष कायद्याअंतर्गत संरक्षित
श्रेणीचा दर्जा देण्यात आला आहे. 

असे बचावतात मासे
त्यामुळे या पक्षांना नदीकिनाऱ्यांहून इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी अनोखी शक्कल लढवण्यात आली. याबद्दल वन्यजीव शास्त्रज्ञ अलेक्स हार्टमान यांनी
सांगितले की, या पक्षांना आकर्षित करण्यासाठी नदीपासून दुर साल्ट पाॅन्डच्या आसपासच्या बेटांवर प्लास्टिकचे पक्षी ठेवण्यात आले आहेत. या पक्षांना जेथे पुर्वीच
पक्षांनी घरटी तयार केली आहेत, तेथे राहणे पसंत नसते. त्याऐवजी ते मोकळ्या ठिकाणी जाणे पसंत करतात. 2015 मध्ये येथील बेटांवर 400 कृत्रिम पक्षी ठेवण्यात
आले होते. खऱ्या पक्षांना आकर्षित करण्यासाठी त्यांचा कृत्रिम आवाजदेखील तयार करण्यात आला. हा प्रयोग चांगलाच यशस्वी झाला. त्यावर्षी तब्बल 224 जोडप्यांनी येथे आपले घरटे तयार केले. 2017 पर्यंत हा आकडा दुप्पट झाला आहे.  

  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fake birds use to save real fish in silicon valley